लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी सैन्य दलाच्या लखनौमधील कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी, हाती रायफल बंदूक घेऊन निशाणाही धरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी, त्यांनी तेथील आधुनिक शस्त्रास्त्रांची माहितीही सैन्यातील अधिकाऱ्यांकडून घेतली. भारतीय सैन्य दल देशातील १४० कोटी भारतीयांच्या शौर्य आणि ताकदीचं प्रतिक आहे. एक शक्तीशाली सैन्यच सुरक्षित व संप्रभु राष्ट्राच्या संकल्पनेला साकार करू शकते, असे यावेळी योगींनी म्हटले.
सैन्य दलाच्या मध्य कमान येथील आयोजित तीन दिवसीय नो युवर आर्मी फेस्टीव्हलचा शुभारंभ मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी, रंगबेरंगी फुगे आकाशात सोडण्यात आली. त्यानंतर, योगी आदित्यनाथ यांनी येथील प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या सैन्य दलाच्या विविध शस्त्रांची पाहणी केली. त्यामध्ये, अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचाही समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी सैन्यातील अधिकाऱ्यांकडून शस्त्रास्त्रांची माहिती घेतली. यावेळी, रायफल हातात घेऊन, एक डोळा झाकून निशाणाही साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे.
देशाच्या राजधानीबाहेर पहिल्यांदाच सैन्य दलाच्या नो युवर आर्मी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबद्दल योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांना धन्यवाद दिले. यावेळी, मुख्यमंत्री योगी यांनी शिख रेजीमेंटने दाखवलेल्या शौर्य कसरतींचे कौतुक केले. आपल्या भारतीय प्राचीन कलेचा नमुना या प्रदर्शनातून पाहण्यात आला. ज्यामध्ये शत्रूराष्ट्राल जशास तसे उत्तर देण्याची ताकत आहे, असेही योगींनी म्हटले.