गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण भाजप 370 जागा जिंकेल असे म्हटले जात होते. मात्र प्रत्यक्षात भाजपचा रथ 240 जागांवरच थांबला. गेल्या दोन वेळच्या निवडणुकीप्रमाणे भाजपला एकट्याला बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचता आले नाही. यामुळे भाजपमध्ये तर चिंतन सुरू आहेच. पण भाजपशी संबंधित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसनेही आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत भाजपची उत्तर प्रदेशातील कामगिरी ज्या कारणांमुळे खराब झाली, त्या कारणांची मिमांसा करण्यात आली.
उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये आरएसएसची आढावा अथवा समीक्षा बैठक सुरू आहे. येथे पूर्व क्षेत्रातील संघ पदाधिकाऱ्यांच्या चार दिवसांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (27 जून) बैठकीचा दुसरा दिवस आहे. य बैठकीत शाखांच्या विस्तारावर जोर देण्यात आला आहे. दलित आणि मागास समाजातील काम आणखी वाढविण्यावर भर देण्याचा संघाचा विचार आहे. यावेळी भाजपच्या उत्तर प्रदेशातील खराब कामगिरीचे सर्वात मोठे कारण दलित आणि मागास समाजाची मते दुरावली असल्याचे मानले जात आहे.
भाजपच्या उत्तर प्रदेशातील खराब कामगिरीची कारणं -लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उत्तर प्रदेशातील कामगिरीमुळे संघदेखील चिंतित आहे. दलित आणि मागास समाजाची मते I.N.D.I.A. कडे वळली, ज्यामुळे भाजपला मोठा फटका बसला. असे मानले जात असले तरी, केवळ हे एकच कारण नाही, तर या निवडणुकीत संघटनेतील पदाधिकाऱ्यांची शिथीलता आणि उदासीनतेसंदर्भातही संघ चिंतित आहे. कारण, उत्तर प्रदेशात भाजप आणि आरएसएसमध्ये समन्वयाचा आभाव राहिल्याचेही बोलले जात आहे.
भाजपसोबत आरएसएसची समन्वय बैठक -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे हे आज बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे समजते. ते पदाधिकाऱ्यांना संबोधित करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीनंतर भाजप सोबत समन्वय बैठक होण्याची शक्यता आहे. याबैठकीलाही होसबळे उपस्थित राहू शकतात. लोकसभा निवडणुकीतील कामगिरीसंदर्भात भाजपमध्येही अंतर्गत आढावा बैठका सुरू आहे.