Lok Sabha Elections 2024: समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि मैनपुरी येथील उमेदवार डिंपल यादव यांनी सत्ताधारी भाजपवर बोचरी टीका केली. त्या बुधवारी समाजवादी पार्टीचे उमेदवार अन्नू टंडन यांचा अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी 'सपा'ला मतदान करण्याचे आवाहन करत भाजपवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी पुलवामा घटनेचा दाखला देत भारतीय जवानांच्या पत्नीचे मंगळसूत्र कोणी हिसकावून घेतले? असा खोचक सवाल विचारला. पुलवामा येथे झालेली दुर्घटना कशी झाली याबद्दल सरकार भाष्य करण्यास तयार नसल्याचे डिंपल यांनी सांगितले.
भाजप सरकारने तरूणांची नोकरी आणि रोजगार हिरावला आहे. आज संपूर्ण देश लोकशाहीची लढाई लढत आहे. ईडीच्या माध्यमातून प्रत्येक वर्गातील लोकांना त्रास दिला जात असून, खच्चीकरण केले जात आहे. उद्योगपती असो की मग नेता प्रत्येकाला ईडीची भीती दाखवली जात आहे. आज मागासवर्गीय, दलित आणि अल्पसंख्याक कोणत्याच वर्गातील लोकांना सन्मान मिळत आहे. देशातील सर्व पैसा ठराविक लोकांच्या खिशात जात आहे, असेही डिंपल यादव यांनी नमूद केले.
अखिलेश यादव लोकसभा लढणार?दरम्यान, सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील मतदासंघातील प्रचार थांबेल. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव कन्नोजमधून लोकसभा लढणार का या प्रश्नावर डिंपल यादवांनी मौन बाळगले. त्यांनी समाजवादी पार्टी आणि इंडिया आघाडीच्या उमेदवार अन्नू टंडन यांचा प्रचार केला. यावेळी त्यांनी उन्नावच्या जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले. रॅलीत सहभागी झालेल्या जनतेचा आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ काढण्याचा मोह डिंपल यांना आवरला नाही.