Akhilesh Yadav: देशाच्या आणि विशेषत: उत्तर प्रदेशच्या राजकारणातील मोठा चेहरा राहिलेल्या दिवंगत चौधरी चरणसिंह यांना भारत सरकारने सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमातून ही माहिती दिली. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून आम्ही यासाठी मागणी केली होती असे म्हटले आहे.
देशाच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, इथे लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा आहेत. चौधरी चरणसिंह हे उत्तर प्रदेशचे भूमिपुत्र असून त्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. आपल्या राजकीय जीवनात प्रथम आमदार बनून त्यांनी संसदीय कामाला सुरुवात केली. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी देशासाठी काम केले. आणीबाणीच्या काळात सरकारविरुद्ध त्यांनी उघडपणे भूमिका घेत आणीबाणीला विरोध केला होता. आणीबाणीच्या काळात लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केल्याचे पंतप्रधान मोदींनी पुरस्कार जाहीर करताना म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले, "देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे हे आमच्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधात देखील ते ठामपणे उभे राहिले. त्यांचे आमच्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेले प्रेम आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.