संभल हिंसाचार प्रकरणी उत्तर प्रदेश पोलीस आणि न्यायिक आयोगाकडून सुरू असलेल्या तपासातून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, मंगळवारी हिंसाचार करणाऱ्या दंगलखोरांचे पाकिस्तान कनेक्शन समोर आले आहे. घटनास्थळी सापडलेले पुरावे याची साक्ष देत आहेत. संभल पोलिसांच्या पथकाला मशिदीजवळील नाल्यांत पाकिस्तानातील ऑर्डिनन्स फॅक्ट्रीमध्ये तयार झालेले 9 एमएमचे एक शेल (shells) सापडले आहे.
फॉरेन्सिक टीमला काय काय सापडलं? -संभल हिंसाचाराच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली होती. दरम्यान, नाल्यांची तपासणी केली असता, पथकाला पाकिस्तानी शस्त्रास्त्र कारखान्यात तयार झालेले शेल्स (काडतूस कवच) आढळून आले. फॉरेन्सिक टीम सोबतच गुप्तचर पोलिस म्हणजेच SIU युनिटही घटनास्थळी पोहोचले होते. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या पथकाला घटनास्थळावरून पाकिस्तान ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील 2 मिसफायर आणि 9 एमएमचे 1 शेल मिळाले आहेत. याशिवाय 12 बोअरचे दोन आणि 32 बोअरचे दोन शेल्सदेखील मिळाले आहेत.
संभल प्रकरणावरून जोरदार राजकारण -संभलमधील हिंसाचारावरून जोरदार राजकारण सुरू आहे. सध्या संभल हे संपूर्ण उत्तर प्रदेशच्या राजकारणाचे केंद्र बनले आहे. सुमारे 10 दिवसांपूर्वी संभलमध्ये झालेल्या हिंसाचारावरून दिवसेंदिवस राजकारण वाढताना दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने संभलमध्ये कलम 163 लागू केले आहे. या परिसरात बाहेरील व्यक्ती आणि राजकीय लोकांना प्रवेश बंदी आहे.