UP Accident: उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळकरी मुलांनी भरलेली भरधाव स्कूल बस उलटून 4 मुलांसह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक मुले गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ जखमी मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, 40 मुलांनी भरलेली बस लखनौ प्राणीसंग्रहालयातून परत येत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बाराबंकीच्या देवा पोलीस स्टेशन हद्दीतील सालारपूरमध्ये हा अपघात झाला. बसमधील सर्व मुले बाराबंकीच्या सुरतगंज विकास गटातील हरक्का गावातील आहेत. ही सर्व शाळकरी मुले शिक्षकांसह लखनौला शैक्षणिक सहलीसाठी गेले होते. लखनौहून परतत असताना हा अपघात झाला. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, समोरुन येणाऱ्या एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बसचे नियंत्रण सुटले आणि यानंतर बस उलटली.
शाळेने सांगितल्यानुसार, बसमध्ये सुमारे 40 मुले आणि 5 शिक्षक होते. या अपघातात 4 शाळकरी मुलांसह बसमधील एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, सूमारे 25 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.