Rahul Gandhi (Marathi News) उन्नाव : राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. ही भारत जोडो न्याय यात्रा देशातील अनेक राज्यांतून सुरू आहे. दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशात आहे. आज उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये भारत जोडो न्याय यात्रा पोहोचली. यादरम्यान, राहुल गांधी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे दिसून आले.
उन्नाव लखनौ बायपासवरून भारत जोडो न्याय यात्रा शहरातून कानपूर रोडने गंगाघाटकडे निघाली. यात्रेसोबतच सकाळी अकराच्या सुमारास राहुल गांधींचा ताफा उन्नाव शहरातून गंगाघाटच्या सहजनी तिराहा येथून मरहाळा चौकात पोहोचला, तिथे राहुल गांधी यांचा ताफा काही वेळ थांबला आणि त्यांनी कार्यकर्त्यांना हात जोडून अभिवादन केले, मात्र यादरम्यान एकच गोंधळ उडला. राहुल गांधी यांच्या सुरक्षेत चूक झाल्याचे दिसून आले. याठिकाणी राहुल गांधी यांच्या सुरक्षा पथकाला ड्रोन कॅमेरा दिसला आणि ही माहिती घटनास्थळी उपस्थित पोलिसांना देण्यात आली.
राहुल गांधी कारमधून बाहेर येताच त्यांच्या आजूबाजूला ड्रोन दिसला, त्यानंतर एका तरुणाला ड्रोन कॅमेऱ्यासह पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस सध्या या तरुणाची चौकशी करत आहेत. यादरम्यान, राहुल गांधी कुठेही जीपमधून खाली उतरले नाहीत, त्यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन केले आणि थेट कानपूरच्या दिशेने रवाना झाले. यावेळी राहुल गांधी यांचा ताफा अर्धा तास गंगाघाट परिसरात थांबला होता. एसपी सिद्धार्थ शंकर मीना यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेला तरुण एक YouTuber असू शकतो, असे म्हटले जात आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सकाळी १० वाजता लखनऊ बायपास येथून शहरात दाखल झाली होती. सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा जोरात सुरू आहे. राहुल गांधी यांच्यासाठी भारत जोडो न्याय यात्रा ही खूप महत्त्वाची आहे, कारण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची भविष्यातील स्थिती आणि दिशा ठरवेल, असे म्हटले जाते.