सीमा हैदर आणि सचिन मीना यांची प्रेमकहाणी भारतापासून पाकिस्तानपर्यंत चर्चेत आहे. आता गुजरातमधील एका व्यावसायिकाने सीमा आणि सचिनला नोकरीची ऑफर दिली आहे. दोघांनाही पन्नास हजार रुपये महिना पगारावर नोकरी दिली जाईल, असे व्यावसायिकामार्फत सांगण्यात आले आहे. दरम्यान, सीमा आणि सचिन यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सीमा आणि सचिनचे कुटुंब आर्थिक संकटाचा सामना करत असल्याची बातमी समोर येताच एका चित्रपट दिग्दर्शकाने त्यांना सर्वात आधी चित्रपटात कामाची ऑफर दिली आहे. यानंतर आता गुजरातमध्ये नोकरीची ऑफर देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधील रबुपूर गावात सोमवारी रात्री उशिरा पोस्टमन एक अज्ञात पत्र घेऊन सचिन-सीमा यांच्या घरी पोहोचला. अज्ञात पत्र पाहून एकच खळबळ उडाली. सीमाला पत्र उघडायचे होते, पण तिच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांनी तिला ते उघडण्यापासून रोखले. ते धमकीचे पत्र असू शकते असे पोलिसांना वाटले. यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हे पत्र उघडले असता, ते गुजरातमधील एका व्यावसायिकाने सचिन आणि सीमा यांना लिहिले असल्याचे आढळून आले. तीन पानी पत्रात सीमा आणि सचिन यांना गुजरातमध्ये प्रत्येकी ५० हजार रुपये पगारावर नोकरीची ऑफर देण्यात आली होती. वर्षानुसार बघितले तर त्यांना वर्षाला प्रत्येकी ६ लाख रुपयांची नोकरीची ऑफर मिळाली आहे.
दुसरीकडे, मेरठचे रहिवासी आणि उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी यांनी सीमा आणि सचिनसाठी मदतीचा हात पुढे केला. अमित जानी यांनी आपल्या फिल्म प्रोडक्शन हाऊस जानी फायरफॉक्समध्ये सीमा आणि सचिनला अभिनयाची ऑफर दिली आहे. अमित जानी यांनी नुकतेच मुंबईत एक फिल्म प्रोडक्शन हाऊस स्थापन केली आहे. ते उदयपूरमधील शिंपी कन्हैया लाल साहू यांच्या हत्येवर 'A Tailor Murder Story ' नावाचा चित्रपट तयार करत आहे. दरम्यान, अमित जानी यांनी आता सीमा आणि सचिनला ऑफर दिली आहे. त्याच्या प्रोडक्शनमध्ये काम केले तर ते दोघांना चांगले मानधन देणार असल्याचे सांगितले आहे.
सोशल मिडियावर सीमा हैदरची प्रेम कहाणी चांगलीच गाजत आहे. मात्र ती प्रेमासाठी आली की काही दुसऱ्या हेतूने आली याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. सीमा हैदर ही पाकिस्तानी गुप्तहेर आहे, असा संशय काही लोकांकडून व्यक्त केला जात आहे. पण हे अजून सिद्ध झालेले नाही. याबाबत भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून सीमा हैदरची चौकशीही करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश एटीएसने अलीकडेच सीमा, सचिन आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती. त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. सचिनची घरची परिस्थीती आधीच हालाखीची आहे, त्यात आता सीमा आणि तिची चार मुलं यांचा सांभाळ देखील सचिनलाच करायचा आहे. दोघांची चौकशी सुरु असल्याने सीमा आणि सचिनला कामासाठी घराबाहेर जात येत नाही आहे. त्यामुळे सचिनच्या हातातील कामही गेलं असून आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.