वाराणसी - तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे चिरंजीव आणि तामिळनाडू राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी 'सनातन धर्मा'वर केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरूच आहे. थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सनातन धर्माचा अनादर खपवून न घेण्याचं सांगत भाजप नेत्यांना काही सूचनाही केल्या आहेत. तर, उदयनिधी यांच्या विधानानंतर अनेक स्वामी, ऋषी, महाराजांनी पुढे येऊन सनातन धर्माचं महत्त्व विषद केलंय. तसेच, उदयनिधींना फटकारलं आहे. आता, सनातन धर्म प्रचारक बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनीही सनातम धर्माबद्दल अपशब्द वापणाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.
धीरेंद्र शास्त्री यांनी सोमवारी काशी येथील मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी बोलताना, त्यांनी भारत हे हिंदूराष्ट्र होणारच, असे म्हणत सनातन धर्माविरुद्ध बोलणाऱ्यांचे दिवस भरले आहेत, असेही म्हटले. सनातन धर्माचा विरोध करणाऱ्यांचा दिवा विझणार आहे. म्हणूनच ते सातत्याने सनातन धर्मावर टीका करत आहेत. मात्र, सनातन धर्मीयांनी चिंता करण्याचं कारण नाही, बालाजींवर विश्वास ठेवावा, असेही शास्त्रींनी म्हटले. काशी हे बाबा विश्वनाथ, कालभैरव आणि माँ अन्नपूर्णाची नगरी आहे. येथील गल्लो-गल्लीत पौराणिक धर्मिक स्थळ आहेत. ज्याचे देशातील आणि जगभरातील सनातन धर्मीयांत महात्म्य आहे.
येथील रस्त्यांवर उघडपणे मांस, मटन विक्री केली जाते. मात्र, हे थांबलं पाहिजे. येथे मांस-मच्छीच्या विक्रीला बंदी घातली पाहिजे, अशी मागणीही बागेश्वरच्या धीरेंद्र शास्त्री यांनी केली. काशीतील दुर्लक्षित मंदिरे व प्राचीन महाविद्यालयांच्या संरक्षणावरही त्यांनी भाष्य केलं. धर्म आणि संस्कृतीच्या शिक्षणास संरक्षण दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन
द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी २ सप्टेंबरला तामिळनाडूमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सनातन धर्माला अनेक 'सामाजिक दुष्कृत्यांसाठी' जबाबदार धरलं होतं. सोबत याला समाजातून हद्दपार करायला हवं असंही म्हटलं होतं. "सनातन धर्म हा जाती आणि धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये फूट पडतो. हा विचार संपवणं म्हणजे मानवता आणि समता वाढवणं.", असेही त्यांनी म्हटलं होतं.