उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेववर बसचा भीषण अपघात झाला. बस नियंत्रणाबाहेर गेली अन् रस्त्यावरून खाली कोसळली. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता द्रुतगती मार्गावरील विश्रामगृहाजवळ हा अपघात झाल्याचे कळते. मेरठ डेपोतील बस क्रमांक UP 15 ET 0592 ही बस मेरठहून दिल्लीला जात होती. या अपघातात १५-२० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या जिल्हा एमएमजी रुग्णालय, संयुक्त रुग्णालय आणि इतरांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, चालकाचा ताबा सुटल्याने बस नियंत्रणाबाहेर गेल्याने अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस घटनास्थळी अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातात जखमी झालेल्या मोहम्मद सादिक या प्रवाशाने सांगितले की, बस रस्त्यावरून खाली कोसळण्यापूर्वी एका खांबाला देखील धडकली होती. मी बसमध्ये झोपलो होतो आणि अचानक मला लोकांचा आरडाओरडा ऐकू येऊ लागला. जेव्हा मी जागा झालो तेव्हा काहीच समजले नाही अन् सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते. मला दुखापत झाली होती आणि त्यानंतर काय झाले ते आठवत नाही. तसेच चालकाचा डोळा लागल्याने अपघात झाला असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.