लखनौ - काश्मीर खोऱ्यातील राजौरी येथे दहशतवाद्यांसोबत लढताना कॅप्टन शुभम गुप्ता यांना गुरुवारी वीरमरण आले. शुभमच्या मृत्यूचे वृत्त कुटुंबीयांना समजताच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. तर, युपीतील त्यांच्या मूळ गावावरही शोककळा पसरली. या घटनेनंतर त्यांच्या मतदारसंघातील नेते आणि उत्तर प्रदेशचेमंत्री योगेंद्र उपाध्याय यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी, राज्य सरकारच्यावतीने शुभमच्या आई-वडिलांना मदतनिधी म्हणून २५ लाख रुपयांचा चेक देण्यात आला. मात्र, यावेळी, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंत्रीमहोदयांवर टीकेची झोड उठली. आता, याप्रकरणी मंत्री उपाध्याय यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यात कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या आई रडताना दिसत आहेत आणि उत्तरप्रदेशचे मंत्री योगेंद्र उपाध्याय व आणखी काही मंत्री त्यांना चेक स्विकारताना फोटो काढण्यासाठी हात धरताना दिसत आहे. मंत्री उपाध्याय यांनी चेक देताना फोटो काढण्यासाठी कॅमेऱ्यासमोर त्यांची इच्छा नसताना पोज देण्यासाठी उभं केल्याचं दिसून येते. विशेष म्हणजे, वीरमाता रडतानाही, हे प्रदर्शन करू नका, असं म्हणतात व्हिडिओत दिसून येते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेते आणि मंत्री महोदयांवर सोशल मीडियातून टीकेची झोड उठली. नेटीझन्सन जोरदार निशाणा साधत नेते मंडळींवर प्रहार केला होता. मात्र, आम्ही हे प्रदर्शन केले नसून ते कुटुंब माझ्या अतिशय जवळचं असल्याचं मंत्री उपाध्याय यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेला शुभम हा त्याच्या लहानपणापासून माझ्या परिचयाचा आहे. विशेष म्हणजे त्याचं शाळेतील अॅडमिशनही मीच केलं होतं. तो माझ्यासाठी घरातील सदस्याप्रमाणे होता. म्हणून, सैन्य दलात भरती झाल्यानंतरही आम्ही घरी गेट टू गेदर करुन आनंद साजरा केला होता, असे उपाध्याय यांनी म्हटले. तसेच, शुभमच्या आईंना चेक घेण्यासाठी बोलावले नव्हते. मात्र, घराबाहेर त्यांच्या मुलाचे शौर्य आणि बलिदान ऐकून त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी होती. गेल्या तीन दिवसांपासून त्या घरातच होत्या. त्यामुळे, शुभमच्या वडिलांनीच त्यांना खोलीतून बाहेर येण्याचं सूचवलं होतं.
वसंत गुप्ता यांच्याकडे चेक दिला जात होता. त्यावेळी, त्या रडत होत्या. मात्र, मीडियावाल्यांनी फोटोचे फ्लॅश सुरू केल्यामुळे त्यांनी मीडियावाल्यांना उद्देशून तसे म्हटले होते. पण, एका काँग्रेस नेत्याने अपप्रचार करुन हा व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर, तो त्याचप्रकारे व्हायरल झाला. आज शुभमच्या वडिलांनीही यावर स्पष्टीकरण दिलं आहे, असे मंत्री उपाध्याय यांनी म्हटलं. तसेच, शुभमच्या कुटुंबीयांस ५० लाख रुपयांची मदत, एक नोकरी देण्यात येईल. तसेच, गावातील एका रस्त्याला शुभमचे नावही दिल जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्याचंही उपाध्याय यांनी सांगितलं.