Maha Kumbh Mela 2025: प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक आले. त्या ठिकाणी ब्रह्म मुहूर्तावर झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही याबाबत तीव्र संवेदना व्यक्त केल्या. परंतु, यावरून ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी संताप व्यक्त करत योगी आदित्यनाथ यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, प्रयागराजमधील परम धर्म संसदेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. हे लोक सत्तेत राहण्यास सक्षम नाहीत. जनतेपासून माहिती लपवली आहे. संत समाजासोबत मोठी फसवणूक झाली आहे. एवढ्या मोठ्या चेंगराचेंगरीची माहिती मिळाल्यानंतर आम्ही शाही स्नान करणार नव्हतो, तेव्हा त्यांनी आम्हाला चुकीची माहिती दिली. त्यामुळे आम्ही मृतांना श्रद्धांजली न वाहता किंवा त्यांच्याबाबत मौन पाळून संवेदना व्यक्त न करता शाही स्नान केले. आमच्यापासून माहिती लपवण्यात आली हे खूप दुःखद आहे. मृत आणि जखमींचे आकडेही उशिरा देण्यात आले, परंतु आम्हाला योग्य माहिती देण्यात आली नाही. २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आम्ही नवीन लोकांना सत्तेत आणू. आगामी निवडणुकीत आपण नवीन पक्ष किंवा नवीन नेत्याना संधी देऊ. २०२७ च्या निवडणुकीत सध्याच्या सरकारला पाठिंबा देणार नाही, या शब्दांत शंकराचार्यांनी हल्लाबोल केला.
योगी आदित्यनाथ यांना तत्काळ मुख्यमंत्रीपदावरून हटवावे
शंकराचार्य पुढे म्हणाले की, जखमींचे आकडे जगभर प्रसारित केले जात होते, परंतु उत्तर प्रदेश प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी जाहीर केले. आम्हाला मृतांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी मौन पाळण्याची संधीही मिळाली नाही. पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी योगी आदित्यनाथ यांना तत्काळ मुख्यमंत्रीपदावरून हटवावे. तरीही कोट्यवधी लोक इथे येणार आहेत, त्यांना गर्दी सांभाळता येत नाही, अशी टीका स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केली.
१ हजार लोकांची व्यवस्था असेल तर तिथे ५ हजारांना आमंत्रित करायचे नसते
मुख्यमंत्री योगी यांच्यासह सर्व सरकारी सोशल मीडिया अकाउंटवर घटनेची योग्य माहिती देण्याऐवजी लोकांना अफवांवर लक्ष देऊ नका, असे आवाहन केले जात होते. अशा परिस्थितीत अनेक धर्माचार्यांना या घटनेची माहिती मिळाली नाही. घटनेची माहिती योग्य वेळी मिळाली असती तर परंपरांचे पालन केले असते. महाकुंभमेळ्यातील तयारी अपूर्ण राहिली. लोकांच्या जीवाशी खेळण्यात आले. आपल्या घरच्या कोणत्याही कार्यक्रमात १ हजार लोकांची व्यवस्था असेल तर तिथे ५ हजार लोकांना आमंत्रित करायचे नसते. महाकुंभमेळ्यात हेच घडले. ४० कोटी भाविक महाकुंभमेळ्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असेल, तर तशी व्यापक सोय करायला हवी होती. परंतु, ते होताना दिसले नाही, असे सांगत शंकराचार्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचे मोठे अपयश
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचे मोठे अपयश आहे. अशा सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. सरकारने स्वतःहून पायउतार व्हावे किंवा जबाबदार लोकांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा. ही इतकी दुःखद घटना आहे की त्यामुळे संत-महंतांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी काळात दररोज लाखो भाविक येतील. या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली नाही तर येणाऱ्या काळात यापेक्षा मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर अत्यंत कठोर कारवाई आवश्यक आहे, असे शंकराचार्यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, परम धर्म संसदेदरम्यान महाकुंभमेळ्यातील सरकार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा उल्लेख करून आणि चेंगराचेंगरीनंतर झालेल्या मृतांची संख्या लपवल्याबद्दल संताप व्यक्त करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. धर्म संसदेत सहभागी झालेल्या सर्व लोकांनी या प्रस्तावाला एकमताने संमती दिली.