उत्तर प्रदेशातीलवाराणसी शहर भगवान शंकराच्या त्रिशूळावर वसलेले आहे, असे म्हणतात. या ऐतिहासिक शहरात भगवान शंकराला समर्पित जगातील पहिले क्रिकेट स्टेडियम बांधले जाणार आहे. शहरातील गंजरी भागात बांधण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची थीम शंकराच्या डमरू आणि त्रिशुळावर आधारित असेल. स्टेडियमच्या लॉन्जला डमरुचा आणि स्टेडियममधील फ्लड लाइट्सला त्रिशुळाचा आकार देण्यात येणार आहे. प्रवेशद्वाराचा आकार बेलपत्राच्या आकारासारखा असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 सप्टेंबर रोजी बनारसच्या गंजरी येथे पूर्वांचलच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करणार आहेत. 30.8 एकरवर बांधण्यात येणाऱ्या या स्टेडियमची क्षमता 30,000 एवढी असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य सरकारने ही जमीन संपादित केली असून त्यावर बीसीसीआय 330 कोटी रुपये खर्चून स्टेडियम बांधणार आहे. भूसंपादनासाठी राज्य सरकारने 121 कोटी रुपये खर्च केले आहेत.
कानपूरच्या ग्रीनपार्क आणि लखनऊच्या एकाना नंतर हे यूपीचे तिसरे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असेल. LNT सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून याचे बांधकाम सुरू करेल. बांधकाम 30 महिन्यांत पूर्ण करण्याची योजना आहे. डिसेंबर 2025 पर्यंत स्टेडियम तयार होईल. यासाठी बीसीसीआय दरवर्षी ठराविक रक्कम राज्य सरकारला भाडेपट्टा म्हणून देईल. या अनोख्या स्टेडियमच्या उभारणीनंतर वाराणसीच्या अनेक वैशिष्ट्यांमध्ये आणखी एका वैशिष्ट्याची भर पडणार आहे.
23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत पीएम मोदी वाराणसीत जाहीर सभेला संबोधित करतील. क्रिकेट स्टेडियमशिवाय 1200 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या 16 अटल शाळांचेही पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होईल. वाराणसीमध्ये पायाभरणी समारंभाच्या निमित्ताने पीएम मोदी रोड शो देखील करू शकतात, असे सांगण्यात येत आहे.