अलिगढ येथे पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी आलेल्या महिलेला पोलिस अधिकाऱ्याकडून चुकून गोळी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून पोलीस अधिकाऱ्याच्या निष्काळीजपणामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्याचे दिसून येते. मृत्युमुखी पडलेली महिला कार्यालयात व्हेरीफिकेशनसाठी संबंधित कर्मचाऱ्याची वाट पाहत होती. त्यावेळी, पोलीस ठाण्यातील अधिकारी हातात बंदुक घेऊन, लोड करुन चेक करत होते. त्याचवेळी, त्यांनी ट्रिगर दाबल्याने बंदुकीतून सुटलेली गोळी थेट महिलेला लागली, त्यामुळे महिला जागीच कोसळली.
अलिगढच्या ऊपरकोट पोलीस ठाण्यात ही घटना घडली असून सीसीटीव्हीत कैद झाल्याने व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेली गोळी महिलेच्या डोक्याला लागली. त्याचवेळी, शेजारी उभा असलेल्या महिलेच्या मुलालाही काय करावे कळेना, त्याने तात्काळ आईला उचलून धरले. त्यानंतर, जवळील जेएन मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले. इकडे संबंधित पोलीस अधिकाऱ्याने घटनास्थळावरुन धूम ठोकली असून त्यांस निलंबित करण्यात आलेआहे.
संबंधित पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्याची मागणी करत समाजवादी पक्षाचे माजी आमदार जमीर उल्लाह यांच्यासह स्थानिकांनी अर्धातास पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या दिला होता. दुपारी तीन वाजता ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी रात्री बाजार बंद केला होता. तसेच, मेडिकल कॉलेजच्याबाहेरही आंदोलन केले.
हड्डी गोदाम निवासी शकील अहमद यांची पत्नी इशरत जहाँ पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी मुलगा ईशानसोबत ऊपरकोट पोलीस ठाण्यात गेली होती. संबंधित कर्मचाऱ्याच्या खुर्चीजवळ ही महिला उभी होती. त्याचवेळी, पोलीस अधिकारी मनोज कुमार यांना शिपायाने शस्त्रागारमधून बंदुक दिली. मात्र, मनोज कुमार यांनी कुठलीही काळजी न घेता बंदुक लोड करुन ट्रिगर दाबला. त्यामुळे, बंदुकीतून सुटलेली गोळी समोरच उभ्या असलेल्या नुसरत जहाँ यांच्या डोक्यावर लागली. हे पाहून नुसरत यांचा मुलगा भयभीत झाला. मात्र, पोलीस अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे जहाँ यांच्या जीवावर बेतले.
दरम्यान, कायद्यान्वये पोलीस अधिकारी मनोज कुमार यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे एसएसपी कलानिधी नेथानी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.