उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यात तिहेरी हत्याकांडाच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने अगोदर आपल्या दोन्ही मुलांचा निर्दयीपणे खून केला. त्यानंतर, पत्नीला जीवे मारुन स्वत: फाशी घेत आत्महत्या केली. या घटनेने जिल्हा हादरला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, मृत्युपूर्वी व्यक्तीने चिठ्ठी लिहिली आहे, त्यात पत्नीकडून त्रास दिला जात असल्याचं म्हटलं आहे. दोन्ही पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होता, असेही समजते.
बलिया जिल्ह्याच्या बांसडीह पोलीस ठाणे हद्दीतील देवडीह गावातील ही घटना असून कौटुंबिक वादातूनच हा धक्कादायक प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासातून पुढे येत आहे. पतीने धारदार शस्त्राने पत्नीसह स्वत:च्या दोन मुलांची हत्या केली आहे. त्यानंतर, स्वत: फाशी घेऊन जीवन संपवले. या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सर्वच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
अंकित राम यांनी बासंडीह पोलीस ठाण्यात येऊन संबंधित घटनेची माहिती दिली. अंकींत यांचे मेव्हुणे श्रवण राम हे त्यांच्या बहिणीसोबत सातत्याने मारहाण करत होते. पोलिसांना दिलेल्या माहितीवरुन घटनास्थळी धाव घेतली असून पत्नी शशीकला आणि त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह घराजवळील बगीचामध्ये आढळून आले. एका मृत मुलाचे नाव सूर्या राव (७ वर्षे), तर दुसऱ्याचे नाव मिट्टू (४ वर्षे) आहे. पोलिसांना तीनही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.
घरासमोरील बगीचामध्ये पत्नी आणि मुलांचे मृतदेह फेकल्यानंतर श्रवण रामने तेथीलच एका झाडाला फाशी घेऊन स्वत:ही जीवन संपवले. पोलिसांनी श्रवण रामचा मृतदेह झाडावरुन खाली उतरवल्यानंतर पंचनामा केला असता, त्याच्या खिशाथ आत्महत्यापूर्वी चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये, कौटुंबिक कलहातूनच आपण हत्या आणि आत्महत्या करत असल्याचे त्याने म्हटले आहे.
दरम्यान, यापूर्वीच पती-पत्नीचा न्यायालयात वाद सुरू होता. मात्र, दीड वर्षांपूर्वी शशीकला पुन्हा एकदा पतीच्या घरी सासरी येऊन राहत होती. पण, पती-पत्नीमध्ये पुन्हा वादावादी होऊ लागली. याच वादातून श्रवण रामने पत्नीसह मुलांचा खून करुन स्वत:ही आत्महत्या केली.