नवीन गाडी घेतल्यास आपण त्याची पूजा करतो, त्या गाडीसमोर नारळ फोडून सर्वकाही शुभ होत असल्याचा आनंद साजरा करतो. मात्र, एका व्यक्तीने नवीन चारचाकी गाडी घेतल्यानंतर गाडीच्या चाकाखाली नारळ फोडणेच त्यांच्या अंगलट आले आहे. उत्तर प्रदेशच्या इटावा येथील एका मंदिराबाहेर ही घटना घडली. संबंधित व्यक्तीने नवीन गाडी घेतल्यानंतर मंदिराजवळ जाऊन पूजा केली. त्यानंतर, पुजाऱ्यांनी गाडीच्या समोर नारळ ठेवला, या नारळावरुन गाडी जाऊ द्या, असे सांगण्यात आले. मात्र, नारळावरुन गाडी नेताना चालकाता ताबा सुटला आणि गाडीचा अपघात झाला.
पुजाऱ्यांच्या सांगण्यावरुन चालकाने गाडीचा स्टार्टर मारला आणि गाडी अनियंत्रित होऊन मंदिरासमोर बसलेल्या भिकाऱ्यांच्या अंगावर गेली. या भीषण अपघातात एका भिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला भिकारीही गंभीर जखमी झाली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इटावा शहरातील सिद्ध पीठ काली मंदिरासमोर ही दुर्घटना घडली.
बुधवारी काही लोक नवीन बोलेरो कार घेऊन मंदिराजवळ आले होते. मंदिराजवळ पुजाऱ्यांकडून गाडीची पूजा करण्यात आली. त्यानंतर, पुजाऱ्यांच्या सांगण्यावरुन नारळावरुन गाडीचे चाक नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचदरम्यान चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यावेळी, मंदिरासमोर बसलेल्या भिखाऱ्यांच्या अंगावरुन गाडी गेली. त्यात, ५० वर्षीय भिकारी कुवरसिंह यांचा जागीच मृत्यू झाला. तर, ६० वर्षीय निर्मला देवी ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, ड्रायव्हरने दारु पिऊन गाडी चालवल्यानेच हा अपघात झाल्याचं जखमी निर्मला देवी यांनी म्हटलं आहे. मृत्यू झालेला भिकारी हा निर्मलादेवीचा भाऊ होता. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गाडी जप्त केली असून गाडीच्या चालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.