राजेंद्र कुमार -
बहराइच : रविवारी झालेल्या हिंसाचारानंतर बहराइचमध्ये सोमवारी तणावपूर्ण परिस्थिती असून, काही लोक लाठ्या आणि लोखंडी रॉड घेऊन रस्त्यावर फिरताना दिसले. काही दुकाने आणि वाहनेही जाळण्यात आली. काही दुकाने, घरे, वाहनांना आग लावण्यात आल्याने धुराचे लोट आकाशात येत होते.
रविवारी येथे दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या जातीय हिंसाचारात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. हिंसाचाराच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली आणि पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
शांतता बिघडवू देणार नाही : केशव मौर्य- उत्तर प्रदेशची शांतता आणि सौहार्द बिघडविण्याचा कोणताही कट यशस्वी होणार नाही.- दंगलखोरांना संरक्षण देणारे पुन्हा एकदा सक्रिय होत आहेत, पण आपण सजग आणि सतर्क राहिले पाहिजे, असे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे. - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंसाचाराचा निषेध केला असून, धार्मिक संघटनांशी संवाद साधून मूर्तीचे वेळेवर विसर्जन करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. - तसेच विसर्जनस्थळी पोलिस कर्मचारी तैनात करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत