उत्तर प्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यात सोमवारी हसनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस आणि दुचाकीचोरांमध्ये झालेल्या चकमकीची पोलखोल झाली आहे. अमरोहा कोर्टाने पोलिसांनी केलेल्या चकमकीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कोर्टाने घेतलेल्या या भूमिकेमुळे पोलिसांची मोठी नाचक्की झाली आहे. एवढंच नाही तर कोर्टाने या चकमकीला संशयास्पद आमि अविश्वसनीय मानत दोन आरोपांना मुक्त केलं आहे. तर एका आरोपीला आर्म्स अॅक्ट अन्वये रिमांडमध्ये पाठवलं आहे.
या एन्काऊंटरनंतर अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची रिमांड घेण्यासाठी हसनपूर पोलीस ठाण्यामधील पोलिस कोर्टामध्ये गेले होते. याबाबत सुनावणी सुरू झाल्यानंतर आरोपींच्या वकिलांनी ही चकमक बनावट असल्याचा दावा केला. तसेच पोलिसांनी आरोपींना घरातून ओढून नेत चकमक झाल्याचा बनाव निर्माण केला, असा आरोप आरोपींच्या वकिलांनी केला. त्यानंतर न्यायाधीशांनी या केसच्या डायरीचा बारीकपणे अभ्यास केल्यावर त्यांनी यामधील अनेक त्रुटी समोर आणल्या.
ही चकमक अविश्वसनीय असल्याचं सांगत न्यायाधीशांनी पोलिसांकडून चालवलेल्या गोळ्यांच्या पुंगळ्या कुठे आहेत, अशी विचारणा न्यायाधीशांनी केली. मेमोमध्येही कॉलम अपूर्ण मिळाला. तीन आरोपींसोबत झालेल्या चकमकीनंतरही चार पोलीस कर्मचाऱ्यांना साधं खरचटलंही नाही का? असा सवाल न्यायमूर्तींनी विचारला. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना आरोपींची रिमांड देण्यास नकार दिला, तसेच आरोपींना मुक्त केले. तर एकाला आर्म्स अॅक्टनुसार तुरुंगात पाठवले.
हसनपूर ठाण्यातील पोलिसांनी सोमवारी रात्री चकमकीनंतर तीन आरोपींना अटक केल्याचा दावा केला होता. त्यानंतर पोलिसांनी या सर्व आरोपींना कोर्टात हजर केले होते. तसेच कोठडीची मागणी केली. मात्र आरोपींच्या वकिलांनी ही चकमक बनावट असल्याचा दावा केला होता. त्यानंतर कोर्टाने पोलिसांवर ताशेरे ओढत हा एन्काऊंटर अविश्वसनीय असल्याचं म्हटलं आहे.