लखनौ: सियाचीन ग्लेशियरजवळ बुधवारी पहाटे भारतीय लष्कराच्या अनेक तंबूंना आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत रेजिमेंटल मेडिकल ऑफिसर कॅप्टन अंशुमन सिंह शहीद झाले. अंशुमन सिंह यांचे 5 महिन्यांपूर्वी 10 फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते. कॅप्टन अंशुमन सुट्टी संपवून 15 दिवसांपूर्वीच सियाचीनला गेले होते. अंशुमन यांच्या घरात शोककळा पसरली आहे.
आर्मी मेडिकल कॉर्प्स अँड कमांड हॉस्पिटलचे वरिष्ठ लष्करी अधिकारी बुधवारी सकाळी अंशुमन सिंह यांच्या घरी पोहोचले. त्यांनी अंशुमन यांचे वडील रवी प्रताप सिंह यांना मुलाच्या हौतात्म्याची माहिती दिली. अंशुमन यांच्या कुटुंबात पत्नी सृष्टी सिंह, वडील रवी प्रताप सिंह, आई आई मंजू सिंह, बहीण तान्या सिंह आणि भाऊ घनश्याम सिंह आहेत. अंशुमन यांच्यावर देवरिया गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. अंशुमन यांच्या वडील आणि काकांसह कुटुंबातील अनेक सदस्यांनी लष्करात विविध पदांवर काम केले आहे.
सैन्यात मेडिकल ऑफिसर म्हणून भरतीबारावीनंतर अंशुमन यांची पुण्यातील आर्मर्ड फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये निवड झाली. तेथून एमबीबीएस केल्यानंतर कॅप्टन अंशुमन सिंग आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये रुजू झाले. आग्रा मिलिटरी हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर अंशुमन यांची तैनाती झाली. अलीकडेच ते काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये तैनात असलेल्या बटालियनचे वैद्यकीय अधिकारी होते. तेथून 15 दिवसांपूर्वी सियाचीनला गेले होते.
50 लाखांची आर्थिक मदत जाहीरमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शहीद अंशुमन सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली आहे. यासोबतच शहीद कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी आणि जिल्ह्यातील एका रस्त्याला शहीद अंशुमन सिंह यांचे नाव देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.