यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक निकालांची नोंद झाली होती. तसेच भाजपाने राम मंदिराच्या मुद्द्यामुळे प्रतिष्ठेच्या केलेल्या अयोध्येच्या ज्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात समावेश होतो, तिथेही भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या ९ जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा आज झाली आहे. मात्र अवधेश प्रसाद हे लोकसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, त्या मागचं नेमकं कारण आता समोर आलं आहे.
उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या रिक्त असलेल्या १० पैकी ९ विधानसभा मतदारसंघांमध्ये १३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. तसेच २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर मिल्कीपूरमधील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. समोर येत असलेल्या माहितीनुसार उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या एका खटल्यामुळे निवडणूक आयोगाने मिल्कीपूरमधील पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही. मिल्कीपूरमधील माजी आमदार गोरखनाथ बाबा यांनी येथे झालेल्या २०२२ मधील निवडणुकीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत येथून अवधेश प्रसाद हे विजयी झाले होते. त्यांनी गोरखनाथ बाबांचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर अवधेश प्रसाद यांच्याविजयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील ज्या १० जागांवर पोनिवडणूक होणार आहे. त्यामधील पाच जागा ह्या समाजवागी पार्टी, तीन जाहा भाजपा आणि राष्ट्रीय लोकदल आणि निषाद पार्टी यांनी जिंकली होती. सध्या उत्तर प्रदेशमधील सीसामऊ, फुलपूर, करहल, मझवां, कटेहरी, सदर, खैर, कुंदरकी आणि मीरापूर येथील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तर अयोध्येतील मिल्कीपूर मतदारसंघातील निवडणूक निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही.