सपा-काॅंग्रेसच्या साेशल इंजिनीअरिंगने वाढविले भाजपचे टेन्शन, उत्तर प्रदेशमध्ये अखेरच्या तीन टप्प्यात ४१ जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 02:08 PM2024-05-20T14:08:49+5:302024-05-20T14:09:37+5:30
इंडिया आघाडीने जातीय समीकरणे विचारात घेऊन उमेदवार निवडले आहेत. उत्तर प्रदेशात काॅंग्रेस आणि सपा एकत्र आले आहेत. त्यांनी अवध, पूर्वांचल आणि बुंदेलखंड या भागात साेशल इंजिनीअरिंगचा फाॅर्म्यूला वापरला आहे.
राजेंद्र कुमार -
लखनाै : लाेकसभा निवडणुकीच्या पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या मतदारसंघांत मतदान हाेणार आहे. या टप्प्यात एकूण ४१ जागा आहेत. या जागांवर भाजप आणि ‘इंडिया’ आघाडीमध्ये चुरशीचा संघर्ष पाहायला मिळेल. इंडिया आघाडीने जातीय समीकरणे विचारात घेऊन उमेदवार निवडले आहेत. उत्तर प्रदेशात काॅंग्रेस आणि सपा एकत्र आले आहेत. त्यांनी अवध, पूर्वांचल आणि बुंदेलखंड या भागात साेशल इंजिनीअरिंगचा फाॅर्म्यूला वापरला आहे.
भाजपसाठी अखेरच्या टप्प्यात संघर्ष
भाजपचे नेते वाराणसी आणि लखनाैमध्ये पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या विजयाचा जसा दावा करीत आहेत, तसा दावा उर्वरित ३९ जागांवर करताना दिसत नाहीत. साेशल इंजीनिअरिंगमुळे ‘इंडिया’चे उमेदवार भाजपला आव्हान देत आहेत.
इंडिया आघाडीचे साेशल इंजिनीअरिंग
अखेरच्या तीन टप्प्यांत ४१ पैकी ३६ जागा अवध आणि पूर्वांचलच्या आहेत. गेल्या निवडणुकीत भाजप व सहायाेगी पक्ष ‘अपना दल’ने ३६ जागांवर विजय मिळविला हाेता. आता त्या पुन्हा जिंकण्याचे या दाेन्ही पक्षांसमाेर आव्हान आहे. ज्या भागात ज्या समुदायाचे वर्चस्व आहे, तिथे त्या समुदायातील नेत्याला उमेदवारी दिली आहे.
- १९ उमेदवार मागासवर्गीय - ११ उमेदवार ब्राह्मण व खुल्या प्रवर्गातील. - ८ उमेदवार कुर्मी समाजातील - ५ उमेदवार निषाद समुदायाचे - ४ उमेदवार पासी समाजाचे - प्रत्येकी एक उमेदवार यादव, पाल आणि मुस्लीम समुदायातील आहे.