विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 09:39 AM2024-05-22T09:39:51+5:302024-05-22T09:40:12+5:30
बहुजन समाज पक्षाला पाठिंबा देऊन आपले मत वाया घालवू नका. लोकांनी अतिशय जागरूक राहून मतदान करावे. भाजप, बहुजन समाज पक्षाने छुपी हातमिळवणी केली आहे, हे जनतेने लक्षात घ्यावे.
मनोज टिबडेवाल आकाश -
नवी दिल्ली : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाच्या वर्षीची लोकसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे, असे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
प्रश्न : मैनपुरी येथून आपली पत्नी डिंपल यादव व कनौज येथील लोकसभा मतदारसंघातून आपण स्वत: निवडणूक लढवत आहात. या दोन जागांमध्ये नेमके कोण मतांच्या अधिक फरकाने निवडून येईल?
अखिलेश यादव : आपला धर्म व संस्कृती यांच्या तत्त्वांचा विचार केला तर मैनपुरी येथील उमेदवारच मतांच्या अधिक फरकाने निवडून येईल.
प्रश्न : लंडनहून पदवी शिक्षण घेऊन मायदेशात परतलेली अदिती यादव पहिल्यांदाच राजकीय व्यासपीठावर दिसली. आपल्या आईवडिलांसाठी तिने निवडणूक प्रचारही केला. आपली कन्या अदिती हा समाजवादी पक्षाचा भविष्यातील चेहरा आहे का?
यादव : राजकारण ही काही सोपी गोष्ट नाही. राजकारणात खूप मेहनत घ्यावी लागते. राजकारण खूप सोपे असते असे वाटणाऱ्या एखाद्याने या क्षेत्रात प्रवेश केला की त्याला या क्षेत्रातील अडचणींची कल्पना येते. इथला प्रवास खडतर आहे.
प्रश्न : उत्तर प्रदेशात निवडणूक प्रक्रियेत प्रशासनाचा दुरुपयोग केला जात आहे, असे आपल्याला वाटते का?
यादव : जिथे असे प्रकार घडल्याचा संशय आला, त्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. काही ठिकाणी निवडणूक आयोगाने कारवाई केली; तर काही ठिकाणी अद्याप ती झालेली नाही. निवडणूक प्रक्रियेत अनेक अडथळे येऊनही जनता उत्साहाने मतदान करत आहे. यासाठी मी लोकांचे मनापासून अभिनंदन करतो.
प्रश्न : सप व काँग्रेस युती लोकसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशात सर्वांत जास्त जागा जिंकेल असे तुम्ही वारंवार सांगत आहात. आपल्याला पूर्वीपासून पाठिंबा देणाऱ्या यादव, मुस्लिम मतदारांबरोबरच मागासवर्गीय, दलित मतदारांनीही तुमच्यासोबत येणे आवश्यक आहे. तसे घडले तरच तुमचा दावा खरा ठरेल, असे वाटते का?
यादव : आम्हांला सर्व वर्गांतील मतदारांचा पाठिंबा आहे. मागासवर्गीय, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्वांचा आम्हांला पाठिंबा आहे.
प्रश्न : दलित मतदार या लोकसभा निवडणुकांत आपल्यासोबत आहेत असे वाटते का?
यादव : मी बहुजन समाजातील लोकांना विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावरून चालणाऱ्या लोकांना सांगतो की, बहुजन समाज पक्षाला पाठिंबा देऊन आपले मत वाया घालवू नका. बहुजन समाजातील लोक तसेच भारतीय राज्यघटना यांच्याशी भाजपने उभा दावा मांडला आहे. त्यामुळे लोकांनी अतिशय जागरूक राहून मतदान करावे. भाजप, बहुजन समाज पक्षाने छुपी हातमिळवणी केली आहे, हे जनतेने लक्षात घ्यावे.