उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यात आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे एका भरधाव बोलेरोने रस्त्याच्या कडेला बसलेल्या ९ जणांना चिरडले. या अपघातात ५ जण मृत्युमुखी पडले. तर ४ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संतप्त झालेल्या गावातील महिलांनी रस्त्यावर उतरत रास्ता रोको करून वाहतूक बंद पाडली. या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले.
हा अपघात संभलमधील राजापूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनूपशहर रोडवर असलेल्या भोपतपूर गावामध्ये झाला. मिळालेल्या माहितीनुसार भोपतपूर गावामध्ये काही लोक रस्त्याच्या कडेला बसले होते. त्यावेळी रस्त्यावरून एक भरधाव बोलेरो आली आणि तिथे बसलेलेल्या लोकांना चिरडून बाजूच्या झाडीत शिरली. या अपघातात एका लहान मुलासह चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर उपचारांदरम्यान, आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अन्य चार जखमींना पोलिसांनी उपचारांसाठी रजपूरा येथील रुग्णालयात दाखल केले आहे. तिथून अधिक उपचारांसाठी त्यांना अलिगड येथे पाठवण्यात आले.
दरम्यान, या अपघातानंतर संतप्त झालेल्या महिलांनी रास्ता रोको करत वाहतूक बंद पाडली. त्यानंतर तिथे पोहोचलेल्या अप्पर पोलीस अधीक्षकांनी त्यांची समजूत घालत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. तसेच जिल्ह्याधिकारी आणि पोलीस अधीक्षकही घटनास्थळी दाखल झाले. अपघातात पाच व्यक्तींचा मृत्यू झाल्याने गावात शोकाचं वातावरण आहे.