कानपूर - उत्तर प्रदेशात भीषण अपघाताची दुर्दैवी घटना घडली. राज्यातील इटावा जिल्ह्यातील कानपूर राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकच्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. वेगवान धावणाऱ्या या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो ट्रक रस्त्याच्या बाजुला असलेल्या धाब्यावर जाऊन आदळला. त्यामध्ये, ४ जणांना फरफटत नेले, त्यात चौघांचाही मृत्यू झाल्याची घटना घडली.
इटावा-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर वेगाने धावणारा ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या धाब्यावर जाऊन आदळला. या दुर्घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर जिल्हाधिकारी अवनीश कुमार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक संतोष कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्य जोमाने सुरू आहे.
शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे एसपी संतोष कुमार यांनी सांगितले. इटावा जिल्ह्याच्या इकदिल परिसरा ही घटना घडली. कानपूरकडून हा ट्रक वेगाने येत होता, जो सर्व्हिस लेनकडे जात होता. त्याचवेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याजवळील धाब्यात घुसला. या दुर्घटनेत इकदिल येथील रहिवाशी सुरज (32), तालिब (30), आग्रा येथील संजय कुमार (35) आणि ढाबा मालक कुलदीप कुमार (35) यांचा ट्रकखाली दबून मृत्यू झाला. तर, फिरोजाबाद येथील सौरभ कुमार आणि इकदिल येथील राहुल कुमार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.