Yogi Adityanath: उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. "सपा असो की काँग्रेस, त्यांच्यात पाकिस्तानची फाळणी मागणाऱ्या मोहम्मद अली जिनांचा आत्मा शिरला आहे. देशाची फाळणी करण्याचे पाप जीनांनी केले होते. अखेरच्या क्षणी त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. आज विरोधकही समाजात फूट पाडून सामाजिक फाळणीच करत आहेत. सामाजिक जडणघडणीला तडा दिला जात आहे. पण पंतप्रधान मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे. ते विरोधी पक्षांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाहीत," अशा शब्दांत आदित्यनाथ यांनी विरोधकांवर टीका केली.
कायदा-सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, "सपा प्रमुख (अखिलेश यादव) यांना या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही. अयोध्या आणि कन्नौजमध्ये मुलींच्या अब्रूशी त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी खेळ केला. त्यांच्या सरकारच्या काळात व्यापाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण होते. पण सुरक्षा आणि सुशासनाशिवाय राज्याची प्रगती शक्य नाही. युवकांना रोजगार मिळत आहे, गुंतवणूक येत आहे आणि राज्यात विकास होत आहे हे राज्याच्या दृष्टीने चांगली बाब आहे," असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
अलिगडमधील संरक्षण कॉरिडॉरबाबत योगी आदित्यनाथ म्हणाले की, अलिगढच्या डिफेन्स कॉरिडॉरमध्ये एक तोफही तयार केली जाईल, जी शत्रूला गप्प बसवेल. येथे तयार केलेली रायफलदेखील परकीय आक्रमणे पळवून लावण्यात यशस्वी ठरेल.