उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या १० जागांसाठी आज मतदान होत आहे. यादरम्यान, अखिलेश यादव यांच्य समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहे. पक्षाचे विधानसभेतील प्रतोद मनोज पांडेय यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पांडेय यांच्या राजीनाम्यानंतर उत्तर प्रदेशमधील राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मनोज पांडेय हे माजी मंत्री असून, सध्या ते राजबरेलीतील ऊंचाहार मतदारसंघातील आमदार आहेत. मनोज पांडेय हे या लोकसभा निवडणुकीत रायबरेली येथून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अखिलेश यादव यांनी डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला ८ आमदारांनी दांडी मारली होती. त्यामध्ये मनोज पांडेय यांच्या राजीनाम्यानंतर समाजवादी पक्षाकडून राज्यसभा निवडणुकीमध्ये क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे.
मनोज पांडेय यांच्याबरोबरच अभय सिंह यांनीही रामललांचा फोटो ट्विट करून जय श्रीराम असं लिहिलं आहे. त्याशिवा विनोद चतु्र्वेदी आणि राकेश प्रताप सिंह यांनीही क्रॉस व्होटिंगचे संकेत दिले आहेत. पूजा पाल आणि पल्लवी पटेल यांनीही क्रॉस व्होटिंग करण्याचा इशारा दिला आहे.