लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात केंद्र सरकारने नवीन संसद भवन उभारलं असून श्रीगणेश चुतर्थीच्या शुभदिनी या संसदेत खासदारांचा प्रवेश झाला. विशेष म्हणजे नवीन संसदेतील प्रवेशाचा मुहूर्त काढूनच सरकारने ५ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले होते, त्यामध्ये अनेक विधेयकांवर चर्चा होत आहे. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाऊलावर पाऊल ठेवत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सराकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. युपीमध्ये नवीन विधानभवन उभारण्यात येणार आहे.
युपीतील नव्या विधानभवानाच्या उभारणीचा मुहूर्तही ठरला असून माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी भूमिपूजन होणार आहे. या नव्या इमारतीच्या उभारणीसाठी तब्बल ३००० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. निरामन दारुलशफा आणि जवळील परिसरात विधानभवनाची नवी इमारत उभारली जाईल. लखनौमध्ये या विधिमंडळाची उभारणी होईल. डिसेंबर महिन्यात या इमारतीसाठी भूमिपूजन केले जाईल. तर, २०२७ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण होईल.
दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभेची सध्याची इमारत १०० वर्षे जुनी आहे. लखनौच्या हतरजगंज येथे ही इमारत असून हा आजा अपुरी पडत असल्याचे समजते. विधानसभा अधिवेशन काळात येथील परिसरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होते. त्यातच, भविष्यात वाढ होणाऱ्या विधानसभा व विधानपरिषद सदस्यांची संख्या लक्षात घेता नवीन इमारत उभारण्यात येत आहे.
केद्रातील मोदी सरकारप्रमाणेच योगींनीही १८ व्या विधानसभेचं एक अधिवेशन नवीन विधानसभेत व्हावं, अशी इच्छा बाळगली आहे. त्यामुळे, २०२७ मध्ये ही इमारत उभारून तयार असणार आहे. सध्याच्या विधानभवनाची उभारणी १९२८ साली करण्यात आली होती. दरम्यान, नवीन विधानभवन उभारणीचा प्रस्ताव यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष सतिश महाना यांनीही या नवीन विधानभवनासंदर्भात माहिती दिली आहे. सरकारचं हे काम असून सरकार त्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलंय.