गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. गणेश चतुर्थीपूर्वी आग्रा येथील एका तरुणाने असा गणपती बाप्पा साकारला आहे, जो बोलू शकतो, ऐकू शकतो, तसेच नैवेद्य खावू शकतो, असा दावा करण्यात येत आहे. एवढंच नाही तर या गणपती बाप्पांच्या शरीरात एक कृत्रिम हृदय देखील बसवण्यात आलं आहे. जे धडधडते, तसंच ही मूर्ती श्वास घेते, असं वाटतं. या मूर्तीकडे पाहिल्यावर ती जिवंत आहे, असा काही काळ भास होतो. आश्चर्याची बाब म्हणजे ट्युब आणि टायरच्या मदतीने ही मूर्ती साकारण्यात आली आहे.
ही मूर्ती घडवणाऱ्या अवलिया तरुणांचं नाव अजय बाथम असं आहे. त्याने आठ ते नऊ महिन्यांचा अथक परिश्रमातून ही मूर्ती साकारली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ही मूर्ती पूजेसाठी ठेवण्यात येणार आहे. अजय यांनी सांगितले की, अशी गणेशमूर्ती साकारण्याची कल्पना मला मागच्या गणेशोत्सवात सूचली होती. तेव्हाच मी ऐकू शकेल, बोलू शकेल अशाप्रकारची आगळीवेगळी गणेशमूर्ती साकारण्याचं ठरवलं होतं.
मूर्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं इलेक्ट्रॉनिक सामान आणि श्वास घेणारी ग्लोबल मोटर फिच केलेली आहे. सुमारे आठ फूट उंचीच्या या गणेश मूर्तीच्या डोळ्यात सीसीटीव्ही कॅमेरे फिट करण्यात आले आहेत. ते मोबाइलद्वारे ऑपरेट होतात. ही मूर्ती डोळ्यांनी समोरच्याचे फोटो काढते. पदस्पर्श केल्यावर तथास्तु म्हणत आशीर्वाद देते. तसेच या मूर्तीला लाडूही भरवता येतो.
ही गणेशमूर्ती साकारण्यासाठी सुमारे आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागला. गणेशमूर्तीच्या शरीरात हृदयाच्या धडधडीसारखा आवाज करणारे ग्लोबर फिट करण्यात आले आले. त्याचा आवाज स्टेथोस्कोपद्वारे ऐकता येतो. ही मूर्ती श्वास घेतेय असा भासही होतो. तिचं पोट आतबाहेर होतं. ही मूर्ती डीसी आणि एसी व्होल्टेजवर काम करते. ही मूर्ती यावर्षीच्या गणेशोत्सवात पुजली जाणार आहे.