उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्याच्या जागोश गावात यमुना नदीमध्ये इंडियन ऑईल कंपनीची गॅस पाईपलाईन फुटली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुराचे पाणी एवढ्या उंचीने उडत आहे की, एखादी मोठी घटना घडण्याची भीती सतावू लागली आहे.
पाईपलाईनमधील गॅस मोठ्या वेगाने पाण्यातून बाहेर पडत आहे व हवेत पसरत आहे. पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळताच कंपनीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. परंतू, पाणी जास्त असल्याने काहीही करता येत नाहीय. यामुळे आसपास राहणाऱ्या लोकांना अलर्ट करण्यात आले आहे.
या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. कंपनीने याची माहिती लोकांना दिली आहे. व्हिडीओमध्ये पाण्याखालील पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा फवारा उडताना दिसत आहे. ही पानिपत-दादरी गॅस पाइपलाइन आहे. पहाटे तीन वाजता छपरौलीतील जागोश गावाजवळ ती फुटली. माहिती मिळताच अग्निशमन दल, पाटबंधारे विभाग आणि जिल्ह्यातील अधिकारी तिथे पोहोचले होते.
गाझियाबादच्या जिल्हादंडाधिकार्यांच्या सूचनेनंतर गॅस पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. कोणतीही जिवीत हाणी झालेली नाहीय. परिस्थिती पाहून रिफायनरीशी संपर्क साधण्यात आला आहे. गॅसचा दाब कमी करून गळती कमी करण्याचे काम सुरू झाले. अचानक पाईपलाईन कशी फुटली याचे कारण समजू शकलेले नाहीय. यमुनेच्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात दगड आदळल्याने पाइपलाइन फुटली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून यमुना, गंगा, शारदा यासह अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. हिंडन नदीचे पाणीही नोएडामध्ये घुसू लागले आहे.