अयोध्या : रामजन्मभूमीवर उभारण्यात येत असलेल्या भगवान रामाच्या मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्रातील सुंद्री, उत्तर प्रदेशातील पखवाजापासून ते तामिळनाडूतील मृदंगापर्यंतच्या विविध वाद्यांचे वादन होणार आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी ही माहिती दिली.
राम मंदिराचे काम अपूर्ण असताना तिथे प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असल्याची टीका झाली. त्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले की, मी कोणत्याही टीकेला उत्तर देणार नाहीत. २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा दुपारी १२.२० ला सुरू होऊन त्याचा दुपारी १ वाजता समारोप होईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राममंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या समारंभस्थळी सुमारे ८ हजार निमंत्रितांसाठी आसनव्यवस्था सज्ज करण्यात आली आहे.
राम मंदिर बांधण्याच्या कामासाठी व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून काम करणाऱ्या एल ॲण्ड टी, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर या दोन कंपन्यांच्या प्रतिनिधींनाही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आल्याचे चंपत राय यांनी सांगितले.(वृत्तसंस्था)
या वाद्यांचे होणार कर्णमधुर वादनराम मंदिरात विविध भारतीय वाद्यांच्या वादनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील बासरी, ढोलक, महाराष्ट्रातील सुंद्री, कर्नाटकातील वीणा, पंजाबमधील अल्घोजा; ओडिशातील मर्दाला, मध्य प्रदेशातील संतूर, मणिपूरमधील पुंग, आसाममधील नगारा, काली, छत्तीसगडमधील तंबोरा, बिहारमधील पखवाज, दिल्लीतील सनई, राजस्थानमधील रावणहत्थ या भारतीय वाद्यांच्या वादनाचा कार्यक्रम पार पडेल. पश्चिम बंगालमधील श्रीखोल आणि सरोद; आंध्र प्रदेशातील घटम, झारखंडमधील सतार; तामिळनाडूतील नादस्वरम आणि मृदंग; आणि उत्तराखंडमधील हुडका यांचे वादनही राम मंदिरात आयोजिण्यात आले आहे.