आयआयटी कानपूरचे वरिष्ठ प्राध्यापक आणि स्टुडंट वेल्फेयरच्या डीन पदावर तैनात असलेले समीर खांडेकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं आहे. प्रा. खांडेकर जेव्हा मंचावर भाषण करत होते, तेव्हा त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. काही वेळापर्यंत तिथे असलेल्या लोकांना काही कळलं नाही. मात्र त्यानंतर त्यांना तातडीने कार्डियोलॉजी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्राध्यापक खांडेकर हे शुक्रवारी आयआयटीच्या ऑडिटोरियममध्ये एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत होते. तसेच चांगल्या आरोग्याबाबत बोलत होते. त्यावेळी आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असे उच्चार त्यांनी काढले आणि अचानक वेदनेने कळवळून खाली बसले. काही वेळ तिथे उपस्थित असलेल्यांना काहीच समजलं नाही. मात्र त्यांचा चेहरा धामाने ओथंबला होता. तसेच ते बेशुद्ध झाले.
प्राध्यापक खांडेकर यांचा मुलगा केंब्रिज विद्यापीठामध्ये शिक्षण घेत आहे. तो आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, असे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले. प्राध्यापक खांडेकर यांचं वय ५५ वर्षे एवढं होतं. त्यांच्या पश्चात कुटुंबामध्ये आई-वडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. खांडेकर यांनी आयआयटी कानपूर येथून बी.टेकची पदवी घेतली होती. त्यानंतर पीएचडी करण्यासाठी ते जर्मनीमध्ये गेले.