लखनऊमध्ये एक भयावह घटना घडली आहे. ईलेक्ट्रीक वाहनांनी पेट घेतल्याच्या घटना घडत असताना आता ई रिक्शाच्या बॅटरींचा स्फोट होऊन शेजारी असलेल्या पाचपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीररित्या होरपळले आहेत.
बीबीडी भागातील एका घरात या ई रिक्शाच्या बॅटरी चार्जिंगला लावलेल्या होत्या. यावेळी या बॅटरींचा मोठा स्फोट झाला आणि त्यामध्ये घरातील २५ वर्षीय महिला, अंगणात खेळत असलेला तीन वर्षांचा मुलगा कुंज आणि एकाचा भाचीचा मृत्यू झाला आहे. तर महिलेचा पती अंकित आणि दुसरी भाची गंभीर भाजले आहेत.
पाचही जणांना लगेचच गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे तिघांचा मृत्यू झाला. अंकित हा बाराबंकीचा आहे. तो लखनऊमध्ये रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करायचा. गुरुवारी सकाळी अंकितने रिक्शाच्या बॅटरी चार्जिंगला लावल्या होत्या. त्याची पत्नी रोली त्या खोलीत झाडू मारत होती. तर मुलगा आणि दोन भाच्या खेळत होत्या. बॅटरींचा स्फोट झाल्यावर त्यातील अॅसिड या पाचही जणांच्या अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले. मोठ्या आवाजामुळे आसपासचे लोक मदतीला धावले होते.
अंकित आणि भाची प्रियाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रियाचे वडील, अंकितची बहीण तिथे आले आहेत. मृत्यूनंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.