उत्तर प्रदेशमधील बहराइच जिल्ह्यात देवीच्या विसर्जन सोहळ्यादरम्यान, दोन गटात वाद होऊन तणाव निर्माण झाला होता. या दरम्यान, रामगोपाल नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी उत्तर प्रदेशपोलिसांनी मोठी करावाई करत या प्रकरणातील आरोपी असलेल्या सफराज आणि फईम यांचा एन्काऊंटर केला आहे. दोन्ही आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोघेही या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अब्दुल हमीदचे मुलगे आहेत. या हिंसाचार प्रकरणी आणखी पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
बहराइच हिंसाचार प्रकरणातील आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते. याची गोपनीय माहिती पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी मागावर राहून त्यांचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर नेपाळच्या सीमेजवळ हांडा बसेहरी नहर येथे झालेल्या चकमकीत दोन्ही आरोपींना गोळ्या लागल्या. दरम्यान, आरोपींच्या पायाला गोळ्या लागल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच त्यांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
दोन्ही आरोपी हे बहराइच हिंसेदरम्यान मारल्या गेलेल्या रामगोपाल मिश्रा याच्या हत्येमध्ये सहभागी होते, असा दावा करण्यात येत आहे. त्यांनीच इतर सहकाऱ्यांसोबत मिळून गोळीबार केल्याचा दावा केला जात आहे. या घटनेचे काही व्हिडीओही व्हायरल होत. आहेत. त्यात अब्दुल हमीद याच्या घराच्या छतावर चार ते पाच लोक दिसून येत आहेत. तिथेच रामगोपाल मिश्रा याच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे.
दरम्यान, गोपाल मिश्रा याच्यावर ज्या घराच्या छतावर गोळ्या झाडण्यात आल्या, त्या घराचा मालक अब्दल हमीद याची मुलगी रुखसार हिने मात्र वेगळाच आरोप केला आहे. तिने सांगितले की, तिचे वडील, सरफराज आणि फहीम हे दोन भाऊ आणि आणखी एका तरुणाला उत्तर प्रदेश एसटीएफने काल संध्याकाळी ४ वाजता ताब्यात घेतले होते. दरम्यान, तिचा पती आणि दिराला पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले होते, असा आरोपही तिने केला.
बहराइचमधील हरदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेहुआ मंसूर गावामधील रहिवासी असलेल्या रामगोपाल मिश्रा याची रविवारी संध्याकाळी ६ वाजता दुर्गा विसर्जनादरम्यान, झालेल्या वादावेळी हत्या करण्यात आली होती. विसर्जन मिरवणूक महराजगंज येथील एका वस्तीजवळ आली असताना दोन्हीकडून वादावादी झाली आणि त्यादरम्यान छतांवरून दगडफेक करण्यात आली. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत पळापळ झाली. या दरम्यान, रामगोपाल याच्यावर एका घराच्या छतावर असताना गोळ्या झाडण्यात आल्या. रामगोपाल याच्या हत्येनंतर परिसरातील तणाव आणखीनच वाढला आहे.