वाराणसी - अयोध्येतील राम मंदिर उभारणीशी जोडलेले हजारो व्यक्ती आहेत, आणि प्रत्येकाची एक विशेष कथा आहे. २२ जानेवारी रोजी होत असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. राम मंदिर उभारणीचा देशभरात उत्साह असून भाविकांच्या नजरा अयोध्येकडे लागल्या आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून तब्बल १७ लाख भाविक अयोध्येत दाखल होणार आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते, सेलिब्रिटीही सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. या सोहळ्यासाठी तब्बल ११ हजार व्हीआयपी व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. तर, संत, महात्मा आणि अयोध्येतील राम मंदिरासाठी संघर्ष करणारे कारसेवकही या सोहळ्यासाठी अयोध्येत येत आहेत. त्यापैकीच, एक आहेत मौनी माता.
झारखंडमधील ८५ वर्षीय वृद्ध महिलेची स्वप्नपूर्ती २२ जानेवारी होत आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची स्वप्नपूर्ती होताच, त्यांचा कंठ फूटणार आहे. तब्बल ३० वर्षांनंतर पहिल्यांदाच त्यांच्या मुखातून आवाज, शब्द बाहेर येणार आहे. सरस्वती देवी यांनी ३० वर्षांपासून मौन बाळगले असून जेव्हा अयोध्येतील राम मंदिर सत्यात उतरेल, तेव्हाच आपण बोलणार अशी प्रतिज्ञाच त्यांनी घेतली होती. सन १९९२ मध्ये ज्या दिवशी बाबरी मस्जिद पाडण्यात आली होती, त्यादिवशी त्यांनी हा प्रण केला होता, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
धनबाद येथील रहिवाशी असलेल्या सोमवारी रेल्वेने उत्तर प्रदेशातील अयोध्येकडे निघाल्या आहेत. मौनी माता या नावाने अयोध्येत त्यांची ओळख आहे. केवळ सांकेतिक भाषेतून गेल्या ३० वर्षांपासून त्या आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधून आहेत. तर, काहीवेळा वहीवर पेनाने लिहून आपल मत सांगतात. आपल्या मौनव्रतापासून त्यांनी काहीवेळ विराम घेतला होता. त्यामुळे, २०२० पर्यंत त्या दररोज दुपारी १ तास संवाद साधत होत्या. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराचे भूमीपूजन केल्यानंतर त्यांनी पुन्हा पूर्णपणे मौन व्रत धारण केल होतं. त्यानंतर, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर त्यांना सर्वाधिक आनंद झाला होता.
दरम्यान, सरस्वती देवी यांना महंत नृत्य गोपाल दास यांच्या शिष्यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण दिलं असून २२ जानेवारी रोजी त्यांचं मौन व्रत कायमचं सुटणार आहे.
११००० व्हीआयपींना सोहळ्याचं निमंत्रण
१२ जानेवारीपासूनच अयोध्येत रामभक्त पोहोचणार असून २२ जानेवारीपर्यंत ते अयोध्या नगरीत वास्तव्यास असणार आहेत. सनातन सेवा न्यासकडून या व्यक्तींना रामजन्मभूमीशी निगडीत स्मृतीचिन्ह दिले जाईल. प्रभू श्रीराम यांच्याशी संबंधित हे स्मृतीचिन्ह अतिशय खास असणार आहे. सनातन सेवा न्यासचे संस्थापक आणि जगदगुरू भद्राचार्य यांचे शिष्य शिव ओम मिश्रा यांनी सांगितले की, अतिथी देवो भवं, म्हणजे अतिथींना देव मानले जाते. त्यामुळेच, अयोध्येत येणाऱ्या पाहुण्यांसाठी प्रभू श्रीराम यांचे स्मृतीचिन्ह बनविण्यात आले आहे. हे स्मृतीचिन्हा ११,००० पाहुण्यांना भेट म्हणून दिले जाईल. यासोबत प्रसादही देण्यात येणार आहे.