उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे आपल्या सासरवाडीत पेटवून देण्यात आलेल्या जावयाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दिल्ली एम्समध्ये उपचारादरम्यान धर्मेंद्रचा मृत्यू झाला. याप्रकरणी, धर्मेंद्रचा भाऊ लोकेश, पत्नी प्रिती, सासू शीला आणि मेव्हणा अजयविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ४ वर्षांपूर्वीच धर्मेंद्रचे लग्न झाल्याची माहितीही लोकेशने पोलिसांना दिली.
धर्मेंद्रला २ मुले असून पती-पत्नीतील वादामुळे गेल्या ३ महिन्यांपासून त्याची पत्नी माहेरी गेली होती. मात्र, त्यादिवशी धर्मेंद्र पत्नीला परत आणण्यासाठी तिच्या माहेरी गेला होता. तेव्हा, त्याच्या सासरच्यांनी अंगावर पेट्रोल टाकून धर्मेंद्रला जिवंत जाळल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांना केला आहे. याप्रकरणी, आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक रवाना झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुमनेश विकल यांनी दिली.
ट्रान्स यमुना पोलीस ठाणेच्या हद्दीतील ही घटना असून जावई धर्मेंद्र येथील सासरी आला होता. त्यावेळी, त्याची पत्नीही तिथेच होती. सासरच्यांना घर बनवण्यासाठी त्याने २ लाख रुपये दिले होते. मात्र, त्याला पैशांची गरज असल्याने त्याने ती रक्कम सासरच्या मंडळींकडे परत मागितली होती. ही रक्कम देण्याची वेळ येऊ नये, म्हणून सासू आणि पत्नीने संगनमताने त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचं फिर्यादीने म्हटले आहे.
दरम्यान, धर्मेद्रला सासरी पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला एस.एन. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला दिल्ली एम्स येथे पुढील उपचारासाठी पाठवले गेले. यावेळी, पोलिसांना दिलेल्या जबाबात धर्मेंद्रने घडला प्रकार सांगितला. तसेच, धर्मेंद्रने पत्नीला घटस्फोट देण्याचं सांगितलं होतं, आणि २ लाख रुपये परत करण्याची मागणी केली होती. म्हणून, त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचेही त्याने सांगितले. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.