उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये फेसबूक इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून बनावट नोटांचा कारभार करणाऱ्या टोळीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. लखनौ पोलिसांनी मडियांव पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातून एका टोळीमधील पाच सदस्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मडियांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीला शाहिद कपूर याच्या फर्जी या वेबसिरीजमधून बनावट नोटा छापण्याची कल्पना सूचला होती. त्यानंतर त्यांनी यूट्युबवरून बनावट नोटा छापण्याचं तंत्र शिकून घेतलं. त्यानंतर ते हुबेहूब बनावट नोटा छापू लागले. मार्केटमध्ये सप्लायसाठी या टोळीने ५० हून अधिक बनावट सोशल मीडिया अकाउंट्ससुद्धा तयार केली होती.
डीसीपी (उत्तर) कासिम आब्दी यांनी सांगितले की, ही टोळी बनावट नोटांचा पुरवठा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये करत होती. आरोपींकडून ३ लाख २० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी सांगितले की, आरोपी २० हजार रुपयांच्या बदल्यात १ लाख मूल्य असलेल्या बनावट नोटा द्यायचे. आरोपींनी यूट्युबवरून बनावट नोटा बनवण्याचं तंत्र शिकून घेतलं होतं. तसेच फर्जी या वेबसीरिजवरून सप्लाय नेटवर्क बनवण्याची पद्धत शिकून घेतली होती. एवढंच नाही तर ते बनावट नोटांची कुरिअरच्या माध्यमातून डिलिव्हरीही करायचे. ही टोळी ५००, २०० आणि १०० रुपयांच्या बनावट नोटा छापायचे. त्यानंतर ते इन्स्टाग्रामवरून बनावट नोटांची डिलिंगही करायचे.
या टोळीचा भांडाफोड करताना पोलिसांनी रवि प्रकाश, विकास सिंह, उत्कर्ष, विकास दुबे आणि विकास भारद्वाज यांना अटक केली आहे. विकास भारद्वाज हा तिहार तुरुंगात राहून आला आहे. त्यांच्याकडून तीन लाख २० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. एवढंच नाही तर आरोपींच्या मोबाईलमधूनही महत्त्वपूर्ण पुरावे सापडले आहेत. ही टोळी मार्केटमध्ये मिळणारा कागद आणि शाईमध्ये बदल करून बनावट नोटा छापत असे.