उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये गुरुवारी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर करत फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. पीडित ७४ वर्षीय वृद्ध असून, त्यांची ७४ हजार रुपयांची फसवणूक झाली. व्हिडीओ कॉलवर धमकी देणारी व्यक्ती निवृत्त एडीजी प्रेम प्रकाश असल्याचे दिसते. मात्र, त्यांचा डीपफेक व्हिडीओ बनवून फसवणूक करण्यात आल्याने ही घटना व्हायरल होत आहे.या प्रकरणातील आरोपीने कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर करून डीपफेक व्हिडीओ बनवला आणि स्वत:ला निवृत्त एडीजी म्हणून सादर केल्याचा पोलिसांना संशय आहे. अशा प्रकारची फसवणुकीची ही पहिलीच घटना असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.गोविंदपूरम येथे राहणारे ७४ वर्षीय अरविंद शर्मा यांनी स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर त्यावर फेसबुक लॉग इन केले. त्यांच्या मोबाईलवर एक व्हिडीओ कॉल आला. त्यावर एक नग्न महिला दिसत होती. हे पाहून त्यांनी कॉल डिस्कनेक्ट केला. सुमारे तासाभरानंतर त्यांना व्हॉट्सॲप कॉल आला. ही व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात दिसली. मी तुमचा व्हिडीओ व्हायरल करेन. जर तुम्हाला हे नको असेल तर माझ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करा, अशी धमकी पोलिसाने दिली. त्यामुळे घाबरून वृद्धाने ७४ हजार रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले.
माजी आयपीएसचा डीपफेक व्हिडीओ बनवून वृद्धाला लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 5:49 AM