अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते या सोहळ्यात रामललांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी, अयोध्येसह देशभरात जय्यत तयारी सुरू असून हा सोहळा संस्मरणीय बनवण्यात येईल. या सोहळ्यासाठी राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या आणि राम मंदिर उभारणीशी खास नातं असलेल्यांना विशेष निमंत्रण दिलं जात आहे. तर, देशातील दिग्गज, नामवंत आणि सेलिब्रिटींनाही सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय. युपीतील ब्रह्मऋषि देवरहा बाबा आश्रमच्या महंतांनाही या सोहळ्यासाठी खास निमंत्रण दिले आहे.
ज्या महापुरुषाच्या आशीर्वादाने मंदिराचे निर्माण झाले, आता तेथे प्राणप्रतिष्ठा होत आहे. मला निमंत्रण पत्रिका मिळणे हे मी माझं भाग्य समजतो. आम्ही अयोध्येला नक्की जाणार, असे महंत श्याम सुंदर दास महाराज यांनी म्हटलं. उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील मईल येथील ब्रह्मऋषी देवरहा बाबा आश्रमातील महंतांनी ३३ वर्षांपूर्वी केलेल्या भविष्यवाणीची या निमित्ताने आठवण समोर आली आहे.
महंत श्याम सुंदर दास यांनी यावेळी सांगितले की, राम मंदिर उभारणीसंदर्भात देवरहा बाबा यांनी ३३ वर्षांपूर्वीच भविष्यवाणी केली होती. आरएसएस नेत्यांसह विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांसमोर महंतांनी हे भाकीत केलं होतं. यावेळी, स्वत: अशोक सिंघल हे देवरहा बाबांना भेटले होते. देवरहा बाबा याची इलाहाबाद येथे राम जन्मभूमीच्या अनुषंगाने सभा आयोजित करण्यात आली होती. सर्वच शंकराचार्य तेथे उपस्थित होते. तेव्हा बोलताना बाबा म्हणाले होते की, मंदिर उभारणीचा संकल्प पूर्ण होईल. हिंदू-मुस्लीम सर्वजण मिळून हे काम पूर्ण करतील.
प्रभू श्रीराम मंदिराचे कार्य आता पूर्णत्वास जात आहे, ही आनंदाची बाब आहे. सरकार त्यासाठी वेगाने काम करत आहे. भारतीय संस्कृतीचा झेंडा सर्वत्र फडकला जात असून सर्वकाही शांततेत होत आहे, असेही महंत श्याम सुंदर दास यांनी म्हटलं. तसेच, आश्रमात असलेल्या पारिजात वृक्षासमोर बोललेल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या वृक्षावर श्रीराम यांचा झेंडा फडकत आहे.