अयोध्या : अयोध्येतील मंदिरामध्ये रामचंद्राच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर भगवान श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्याधाममध्ये लोकांची गर्दी होऊ लागली आहे. मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यातच श्रीरामाच्या दरबारी महाराष्ट्रातील ढोल, ताशाचा गजर पाहायला मिळाला. यासंबंधीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राम मंदिर परिसरात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात पुण्यातील श्रीराम पथकाच्या ढोल, ताशाच्या वादनाने अयोध्यानगरी मंत्रमुग्ध केली. पुण्याच्या संस्कृतीचे अयोध्येत प्रदर्शन करून श्रीराम पथकाने ढोल-ताशाच्या वादनाने रामललाच्या चरणी आपली सेवा अर्पण केली आहे. याचबरोबर, या पथकाला काशी विश्वेश्वर येथील मंदिराच्या परिसरातही वादन करण्याची संधी देण्यात आली आहे. या श्रीराम पथकामध्ये ५० ढोल, २५ ताशा आणि ध्वज असून पथकाच्या अनेक सभासदांनी अयोध्येत हजेरी लावली.
अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्यात भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. मंदिर परिसरातच लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे भाविकांना सुरक्षेच्या अनेक फेऱ्या पार कराव्या लागत आहेत. मंदिर आणि परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सध्या अयोध्येत फक्त त्या वाहनांना परवानगी आहे, ज्यांच्याकडे आधीच 'पास' आहेत. शहरात ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
दरम्यान, राम मंदिराच्या उद्घाटनाच्या जवळपास दोन आठवड्यांपूर्वी अयोध्येतील हॉटेल बुकिंग ८० टक्क्यांनी वाढले आहे. येथे हॉटेलमधील एका दिवसाच्या खोलीची किंमत सर्वकालीन उच्च दरावर पोहोचली आहे, जी पाच पटीने वाढली आहे. काही आलिशान खोल्यांचे भाडे एक लाख रुपयांपर्यंत गेले आहे. विशेष म्हणजे भाड्यात एवढी वाढ होऊनही हॉटेल बुकिंग दररोज वाढत आहे.