कानपूरमध्ये गंगा घाटाजवळ असलेल्या रेल्वेमार्गाखाली नाविकांना एक महिला जखमी अवस्थेत सापडली. ही महिला विवस्त्रावस्थेत होती. ती सातत्याने रडत होती. नाविकांनी त्वरित याबाबतची माहिती गंगा घाटावरील पंडा राजू यांना दिली. राजू यांनी या महिलेला त्वरित वस्त्र आणून दिली. तसेच तिची विचारपूस केली.
पीडित महिलेने सांगितले की, मंगळवारी सकाळी ६ ते ७ च्या सुमारास धावत्या ट्रेनमधून काही लोकांनी तिला धक्का दिला. त्यामुळे ती पुलावरून थेट गंगा नदीच्या पात्रात पडली. सुदैवाने नदीमध्ये पाणी कमी होते. त्यामुळे ती कशीबशी किनाऱ्यावर पोहोचली. महिलेनं दिलेली माहिती ऐकून राजू यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी या महिलेला त्वरित रुग्णायलात पाठवले. कारण तिला खूप दुखापत झालेली होती.
तुमच्यासोबत काही गैरप्रकार घडला आहे का? असं पोलिसांनी या महिलेला विचारलं. मात्र ही महिला त्याबाबत काही स्पष्ट उत्तर देऊ शकली नाही. घडल्या प्रकारामुळे धक्का बसल्याने ही महिला काही बोलत नसल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सध्यातरी या महिलेवर उपचार करण्यात येत आहेत. तसेच तिच्यासोबत काही गैरप्रकार घडलेला नाही हे जाणून घेण्यासाठी तिची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, पंडा राजू यांनी सांगितले की, जेव्हा मी या महिलेला पाहिले तेव्हा ती खूप घाबरलेली होती. तिच्या शरीरावर एकही वस्त्र नव्हते. तसेच शरीरावर जखणांच्या खुणा होत्या. तिला ८० फूट उंच पुलावरून खाली फेकण्यात आले होते. त्यामुळे तिला खूप जखमा झाल्या होत्या.