लखनौ - उत्तर प्रदेशात सध्या जे घडत आहे, जे यापूर्वी कधीच घडले नव्हते. एकेकाळी गरिबांच्या जमिनींवर माफिया कब्जा करत असत, मात्र योगी सरकार आल्यानंतर माफियांच्या जमिनीवर गरिबांसाठी घरे बांधली जात आहेत. संगम नगरी प्रयागराजमध्ये माफिया अतिक अहमदच्या ताब्यातून मोकळ्या झालेल्या जमिनीवर गरिबांसाठी फ्लॅट तयार करण्यात आले आहेत.
आता लवकरच गरिबांना त्यांच्या स्वप्नातील घराच्या चाव्या मिळणार आहेत. यासाठी प्रयागराज विकास प्राधिकरण (PDA) लवकरच तारखा जाहीर करू शकते. येत्या दोन दिवसांत या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या घरांना पूर्णपणे भगवा रंग देण्यात आला आहे. सजावटीचे काम वेगाने पूर्ण झाले आहे.
१७३१ चौरस मीटर जमिनीवर फ्लॅट बांधले
या सदनिकांचे लॉटरीद्वारे वाटप करण्यात येणार आहे. पीडीएचे अधिकारी या घरांवर लक्ष ठेवून आहेत. लुकरगंज भागात माफिया अतिक अहमदच्या ताब्यातून मुक्त केलेल्या जमिनीवर गरिबांसाठी फ्लॅट बांधले जात आहेत. १७३१ चौरस मीटर जागेवर हे ७६ फ्लॅट तयार आहेत, जे लवकरच लॉटरीद्वारे गरिबांना देण्यात येणार आहेत.
६ हजारांहून अधिक लोकांनी अर्ज केले
माफियांच्या जमिनीवर बांधलेल्या सदनिका मिळविण्यासाठी झुंबड उडाली आहे. यासाठी प्रयागराज विकास प्राधिकरणात ६ हजार ६० जणांनी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यासाठी ड्युडामार्फत तपास करण्यात आला असून आता पात्र ठरलेल्यांची लॉटरी काढण्यात येणार आहे. या ४ मजली इमारतीत पार्किंग, कम्युनिटी हॉल आणि सौर दिवे असतील. ही इमारत पूर्णपणे ग्रीन बिल्डिंग असेल. लाभार्थ्यांना ६ लाखांना सदनिका मिळेल, ज्यामध्ये १.५ लाख भारत सरकारकडून आणि एक लाख राज्य सरकारकडून अनुदान म्हणून दिले जातील. योजनेतील निवड झालेल्या लाभार्थ्यांना साडेतीन लाख रुपये भरावे लागणार आहेत.
अतिकची ११६९ कोटींची मालमत्ता जप्त
योगी सरकार आल्यापासून अतिक अहमद याच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवला जात होता. गेल्या २ वर्षात अतिक अहमदची बहुतांश बेकायदेशीर मालमत्ता एकतर जप्त करण्यात आली आहे किंवा त्यावर बुलडोझरचा वापर करण्यात आला आहे. प्रशासनाने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अतिक अहमद यांची ११६९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यातील ४१७ कोटींची मालमत्ता प्रशासनाने ताब्यात घेतली असून, सुमारे ७५२ कोटींच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. लुकरगंजची ही जमीन या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये होती, अतिक्रमण हटवल्यानंतर योगी सरकारने गरिबांसाठी सदनिका बांधण्याचा निर्णय घेतला होता. आता फ्लॅट तयार आहेत.