उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यातील माधौगंज ठाणे क्षेत्रामध्ये लग्नात डान्स करून पतीसोबत झालेल्या भांडणानंतर एका महिलेने बाईकवरून उतरून कालव्यात उडी मारली. पत्नीला वाचवण्यासाठी पतीनेसुद्धा कालव्यात उडी मारली. मात्र कालव्यातील पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे दोघेही वाहून गेले.
दरम्यान, या दोघांचाही पाणबुड्यांच्या मदतीने शोध घेतला जात आहे. मात्र आतापर्यंत दोघांचाही काही शोध लागलेला नाही. दोघेही पती-पत्नी नातेवाईकाच्या घरी लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. तिथे त्या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर तिथून घरी परतताना पत्नीने दुचाकीवरून उतरून कालव्यात उडी मारली.
पत्नीला वाचवण्यासाठी पतीनेसुद्धा कालव्यात उडी मारली. मिळालेल्या माहितीनुसार माधौगंज ठाणे क्षेत्रातील नेवादा गावात राहणाऱ्या मानसिंह यांचे नातेवाईक बिलग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अख्तियारपूर येथे राहतात त्यांच्या घरी लग्नात सहभागी होण्यासाठी मानसिंह हे त्यांच्या पत्नीसह गेले होते.
पीडित कुटुंबाने सांगितले की, लग्नात आरती तिच्या बहिणींसोबत डान्स करत होती. त्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. दोघेही माधौगंज येथून निघून शारदा कालव्याजवळ असलेल्या पुलावर पोहोचले. तिथे दुचाकीचा वेग काहीसा कमी झाला. त्याचवेळी आरतीने दुचाकीवरून अचानक उडी मारली आणि कालव्यात उडी घेतली.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांना धक्का बसला. पोलिसांसोबत नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले. आता पाणबुड्यांच्या मदतीने दोघांचाही शोध घेतला जात आहे. मात्र आतापर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. अप्पर पोलीस अधीक्षक दुर्गैश कुमार सिंह यांनी सांगितले की, दोघांचाही शोध घेतला जात आहे.