लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये झालेली पक्षाची पीछेहाट भाजपाच्या जिव्हारी लागली आहे. लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशात पक्षाच्या जागा मोठ्या प्रमाणात घटल्याने भाजपाला केंद्रात बहुमतापासून दूर राहावे लागले होते. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पराभवानंतर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार आणि पक्षसंघटनेमधील अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्यामधील मतभेदही समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकार आणि राज्यातील पक्षाच्या संटनेमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हे फेरबदल उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभेच्या १० जागांवरील पोटनिवडणुकीनंतर होतील. मात्र त्यामध्ये मुख्यमंत्र्यांना बदलण्याची कुठलीही शक्यता नाही. तर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आणि भाजपाच्या पक्षसंघटनेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या १० जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात खलबतं होत आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याकडून करण्यात येत असलेल्या विधानांमुळे भाजपामध्ये अंतर्गत वाद उफाळून आल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता पुढे होणारं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी भजपाकडून प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत एक बैठक घेत आहेत. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्यांच्या मंत्र्यांकडून पोटनिवडणुकीच्या तयारीबाबत माहिती घेत आहेत. तसेच पुढील रणनीतीबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीचं महत्त्व आणखीनच वाढलं आहे. लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर आता विधानसभेच्या पोटनिवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.