उत्तर प्रदेशमधील जनसत्ता लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांनी उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये केलेल्या भाषणाची सध्या चर्चा होत आहे. राजा भैय्या यांनी आपल्या भाषणामधून अयोध्येत बांधलेले राम मंदिर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. आदि शंकराचार्यांनंतर जर कुणी सनातन धर्माच्या उत्कर्षाचं काम करत असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत, असे कौतुकोद्गार राजा भैय्या यांनी काढले आहेत.
सभागृहातील आपल्या भाषणामध्ये राजा भैय्या म्हणाले की, डॉ. लोहिया यांना मानणाऱ्या लोकांनाही माहिती आहे की, सामान्य लोक दरवर्षी रामायण यात्रेचं आयोजन करायचे. बाबर, गझनी, औरंगजेब हे लुटारू होते, रसखान आणि रहिम हे आमचे पूर्वज होते, असे लोहिया सांगायचे, असा दावाही राजा भैय्या यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, मागच्या काही दिवसांपासून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हल्द्वानीमध्ये हे दिसून आले आहे. राज्यातील वातावरण बिघडू नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. ते पुढे म्हणाले की, भिंतीवर घुमट बांधल्याने ही गंगा जमनी तहजीब नाही आहे, हे स्पष्ट होत आहे. राम मंदिरी, काशी विश्वनाथ मंदिर आमि कृष्ण जन्मभूमीला आक्रमणकर्त्यांनी लक्ष्य केलेले आहे.
राजा भैय्या पुढे म्हणाले की, व्यास जींच्या तळघरात पूजा सुरू झाली आहे. एक ना एक दिवस असं सरकार येईल, जे तळघराला लागलेले कुलून उघडेल या विश्वासाने ३१ वर्षे चावी सांभाळून ठेवणाऱ्या त्या पुजाऱ्याला आम्ही प्रणाम करतो. आम्ही मुस्लिमांसोबत राहू शकत नाही, असं कुठल्याही हिंदूने म्हटलेलं नाही. जो कुणी संकटात सापडला आहे, त्याला आम्ही जवळ केलं आहे. श्री रामाचं मंदिर आमच्या काळात उभं राहतंय, हे आमच्या पिढीचं भाग्य आहे, असेही राजा भैय्या म्हणाले.