लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळाबद्दल लोकांच्या मनात प्रचंड उत्साह आहे आणि तो मतांमध्ये रूपांतरित होत आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एनडीएचे सरकार प्रचंड बहुमताने स्थापन होणार आहे. यात शंका नसावी. जनतेकडूनच विरोधकांचा खोटारडेपणाही उघड पाडला जात आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे, ते रविवारी त्यांच्या शासकीय निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
तुष्टीकरणाच्या नावाखाली व्होट बँकेचे राजकारण -एका प्रश्नाला उत्तरात देताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, "बिगरभाजप शासित राज्यांमधील हिंसाचार, हा तुष्टीकरणाच्या धोरणांचा दुष्परिणाम आहे. रामनवमी आणि होळीच्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये तसेच बिगर भाजपशासित राज्यांमध्ये झालेल्या दंगली म्हणजे बहुसंख्य समाजाच्या भावनांशी खेळण्यासारखे आहे. तुष्टीकरणाच्या नावाखाली व्होट बँकेच्या राजकारणाने नेहमीच सांप्रदायिक तेढ निर्माण केली आहे."
पुढे बोलताना योगी म्हणाले, "पश्चिम बंगालमधील रामनवमीच्या शोभायात्रांवर पुन्हा झालेले हल्ले चिंतेचा विषय आहे आणि देशातील जनतेसाठी एक संदेशही आहे की, हे लोक शांततापूर्ण शोभायात्रांना संरक्षण देऊ शकत नाहीत, तर भगिनींना आणि सामान्य नागरिकांना सुरक्षा देऊ शकतील का? निवडणूक ही तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकांना आणि पक्षांना संदेश देण्याची सर्वोत्तम संधी असते. आपल्या मतातून यांना संदेश द्या की, आमच्या भावनांशी खेळाल आणि सुरक्षेचा भंग करणाऱ्यांना आश्रय द्याल तर, आम्हीही निवडणुकीतून त्याच पद्धतीने उत्तर देऊ."