उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. गोरखपूरला लागून असलेल्या बस्ती जिल्ह्यातील गोर पेलीस ठाण्याच्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हादेखील दाखल केला आहे. एका व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये हा धमकीचा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर, ‘ग्रुप अॅडमिन’ने ‘एक्स’वर व्हिडिओ पोस्ट करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.
गौर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोगिया गावातील रहिवासी अभिषेक कुमार दुबे यांनी पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दिली आहे. ते म्हणाले, आपण 'सनातन धर्म सर्वोपरी' या नावाने एक व्हॉट्सअॅप ग्रुप चालवतो. ओपन लिंकद्वारे एक अनोळखी नंबरही ग्रुपमध्ये सहभागी झाला. या नंबरवरून ग्रुपवर एक व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे. साधारणपणे ११ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये दोन लोक बोलताना ऐकू येत आहे. एक व्यक्ती मुख्यमंत्री योगींना बॉम्बने उडवण्यासंदर्भातत बोलत आहे. तर दुसरा त्याला सहमती दर्शवत आहे. महत्वाचे म्हणजे, या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीचा चेहराही दिसत आहे.
यासंदर्भात अभिषेकने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ज्या क्रमांकावरून व्हिडिओ पोस्ट करण्यात आला, त्यावर फोन करून आपण विचारणा केली असता, संबंधित व्यक्तीने तो व्हिडिओ त्यानेच तयार केला असल्याचे कबूल केले आहे. यानंतर, पोलिसांनी गुन्हा दाखल करून यासंदर्भात तपास सुरू केला आहे.
प्राथमिक तपासात हा मोबाईल क्रमांक कासगंज जिल्ह्यातील एका व्यक्तीचा असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे प्रभारी पोलिस स्टेशन अधिकारी विनय प्रताप सिंह यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सीओ हरैया कार्यालयातील निरीक्षक संजय सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. खरे तर, यापूर्वीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना, अशा प्रकराच्या धमक्या मिळाल्या आहेत.