जगात असे काही लोक आहेत जे आपल्या आई-वडिलांना देवाचा दर्जा देतात आणि अशा लोकांवर देवही प्रसन्न असतो. उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये अशी तीन मुलं आहेत जी या कलियुगात आपल्या आईवडिलांसाठी श्रावणबाळ बनली आहेत. तिन्ही मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांना खांद्यावर उचलून राजघाटावरून सासनी येथे आणले आहे. सोमवारी सासनी येथील विलेश्वर धाम मंदिरात वृद्ध दाम्पत्याने भगवान शंकराला गंगेच्या पाण्याने अभिषेक केला.
तिन्ही मुलं आपल्या आई-वडिलांना खांद्यावर घेऊन रस्त्याने जात असताना त्यांना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. रस्त्यावर मोठ्या संख्येने लोक जमा झाले. त्याचवेळी मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटाही त्यांच्यासोबत दिसला. मिळालेल्या माहितीनुसार, 75 वर्षीय बदन सिंह बघेल हे पत्नी अनार देवी आणि तीन मुलांसोबत हाथरसच्या हरी नगर कॉलनीत राहतात.
बदन सिंह नेत्रहिन आहेत. अशा स्थितीत त्यांनी आपल्या मुलांसोबत गंगेत स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांची तीन मुलं रमेश, विपिन आणि योगेश त्यांच्या वडिलांना रामघाटावर गंगेत स्नान करण्यासाठी घेऊन गेले. आई-वडीलांना गंगेत स्नान करून, कावडमध्ये बांधलेल्या खाटेवर बसवून मुले सासनी नगरातील विलेश्वर धाम मंदिराकडे रवाना झाली. मुलांसह त्यांच्या पत्नी आणि मुलंही उपस्थित होती.
तिन्ही मुलांनी आई-वडिलांना खांद्यावर घेऊन सुमारे 150 किलोमीटरवर असलेल्या सासनी परिसरात नेले. त्याचवेळी पोलीसही सक्रिय झाली. त्यानंतर पोलीसही त्यांच्यासोबत फिरत असल्याचे दिसून आले. त्यानंतर आज तिन्ही मुलांनी विलेश्वर धाम मंदिरात आपल्या आई-वडिलांकडून अभिषेक केला. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.