मान्सून बऱ्यापैकी सक्रीय झाल्याने देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक राज्यांमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बिजनौर जिल्ह्यातील अनेक गावात पूर आला आहे. तसेच गंगा नदीमधील पाण्याची पातळी वाढल्याने अनेकांची घरं पाण्यात बुडाली आहेत. तसेच अनेक मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. यादरम्यान, नजीबाबाद येथून हरिद्वार येथे जात असलेली रूपहडिया डेपोची एक बस कोटावाली नदीमध्ये अडकल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान, या बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
बिजनौरमध्ये भागूवाला येथील कोटावाली नदीची पाणी पातळी खूप वाढली आहे. तसेच नदीतून पुराचं पाणी वेगानं प्रवाहित होत आहे. यादरम्यान, नजीबाबाद येथून हरिद्वार येथए जाणारी रुपहडिया डेपोची बस नदीच्या वेगवान प्रवाहामध्ये अडकली. या बसमधून सुमारे ४० प्रवासी प्रवास करत होते. नदीमध्ये अडकल्यानंतर त्यांना आरडाओरड सुरू केली. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे मदतकार्यात अडचण येत होती. अखेर जेसीबीची मदत घेऊन या बसमधील प्रवाशांची सुटका करण्यात आली.
बिजनौरमधील डोंगराळ भागांमध्ये सातत्याने पाऊस पडत असल्याने वरून येणारं पाणी गंगा आणि सहाय्यक नद्यांमध्ये मिळत असल्याने या नद्यांना पूर आला आहे. तसेच गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या १३ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार आग्रा, अलिगड, बिजनौर, बदांयू, फार्रुखाबाद, फिरोजाबाद, गाझियाबाद, मथुरा, मुझफ्फरनगर, सहारनपूर, शाहजहाँपूर आणि शामली मधील मिळून ३८५ गावांमधील ४६ हजार ८३० लोकांना पुराचा फटका बसला आहे. तसेच या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती अधिकच गंभीर होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.