उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे गणपती विसर्जनाच्या वेळी मोठी दुर्घटना घडली आहे. मार्कण्डेय ऋषी मंदिराजवळील तलावात पाच जण बुडाले. हे पाहून घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पाण्यात बुडणाऱ्या लोकांना बाहेर काढलं. मात्र तोपर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला होता. एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सैफई पीजीआयमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
ही संपूर्ण घटना जिल्ह्यातील घिरोर शहरातील ऋषी मार्कण्डेय मंदिर परिसरात बांधलेल्या विधूना कुंडात घडली. जिथे गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी आलेले पाच जण तलावात बुडाले. हे पाचही जण तलावात अंघोळ करण्यासाठी उतरले होते. मात्र त्यानंतर ही घटना घडली. त्यांना बुडताना पाहून घटनास्थळी एकच गोंधळ झाला.
एका तरुणाला वाचवण्यात यश आले तर 4 जण बुडाले. त्यांना बाहेर काढले, तोपर्यंत त्यातील 3 जणांचा मृत्यू झाला होता. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला सैफई मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. आग्रा येथेही अशीच घटना घडली आहे. तर गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी मंडी सईद खान येथे राहणारे पाच तरुण बुडाले. यातील दोन तरुणांना वाचवलं मात्र तीन जणांना वाचवता आलं नाही. नंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, यमुनेमध्ये मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मंडीतील काही तरुण शाहिद खान टेम्पोने पोईया घाटावर आले होते. मात्र त्यांना पाण्याच्या खोलीची कल्पना नसल्याने ते बुडू लागले. त्यांनी आरडाओरड सुरू केल्यावर लोकांच्या लक्षात आलं. कैलास घाट, पोईया घाट, बाळकेश्वर घाट, हाती घाट येथे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तरुण विसर्जनासाठी दुसऱ्या ठिकाणी पोहोचले जिथे ना पोलीस होते ना कुठली यंत्रणा होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.