उत्तर प्रदेशमधील सहारनपूर पोलिसांनी चोरीला गेलेल्या दोन म्हैशी तपास करून पाच दिवसांच्या आत शोधून आणल्या आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दोन म्हैशी चोरीला गेल्या होत्या. पोलिसांना या म्हैशी ताब्यात घेतानाच गुरांची तस्करी करणाऱ्या टोळीतील तीन जणांना अटक केली आहे. सध्या या म्हैशी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्या आहेत.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सहारनपूरच्या फतेहपूर पोलीस ठाण्यामध्ये २० आणि २२ ऑगस्ट रोजी म्हैशी चोरीला गेल्याच्या दोन तक्रारी आल्या होत्या. याबाबत खुलासा करण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. या आरोपींनी त्यांची सहा जणांची टोळी असल्याची माहिती दिली. आता उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच त्यांनाही लवकरच बेड्या ठोकल्या जातील असे पोलिसांनी सांगितले.
उत्तर प्रदेशमध्ये पशू चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. याआधी उत्तर प्रदेश सरकारमधील तत्कालीन मंत्री आझम खान यांच्या सात म्हैशी चोरीला गेल्याची घटना काही वर्षांपूर्वी खूप गाजली होती. त्यावेळी म्हैशींचा शोध घेण्यासाठी पोलिसांसह, बडे अधिकारीही कामाला लाहले होते. तसेच या शोधमोहिमेचं नेतृत्व रामपूरच्या पोलीस अधीक्षकांनी केलं होतं, अखेरीस या म्हैशी शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं होतं.